भाड्याने घेतलेल्या कॅमेर्यासह लेन्स व इतर साहित्यांचा अपहार
सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – भाड्याने घेतलेल्या महागड्या कॅमेरा, कॅमेरा लेन्स व इतर साहित्य असा साडेदहा लाखांचा मुद्देमालाचा अपहार करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस सात महिन्यांनी गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अनुराग ऊर्फ अकरम गिरीशकुमार पांडे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून लवकरच अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
67 वर्षांचे लक्ष्मण चंद्रभान जैन हे अंधेरीतील लोखंडवाला, शास्त्रीनगरचे रहिवाशी आहेत. त्यांचा गोरेगाव येथील मोतीलाल नगर परिसरात भाड्याने महागडे कॅमेरा, कॅमेरा लेन्ससह इतर साहित्य देण्याचा व्यवसाय आहे. 27 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 रोजी त्यांच्या कार्यालयात अनुराग आला होता. त्याने त्यांच्याकडून विविध नामांकित कंपन्याचे 10 लाख 67 हजार रुपयांचे कॅमेरा, कॅमेरा लेन्स व इतर साहित्य भाड्याने घेतले होते. त्याच्याकडून त्याचे वैयक्तिक कागदपत्रे आणि भाड्याची रक्कम घेतल्यानंतर त्याला ते साहित्य देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कॅमेरा, लेन्स आणि इतर साहित्य परत केले नाही. वारंवार कॉल करुनही त्याने त्यांना प्रतिसाद दिला नव्हता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अनुराग पांडे याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अनुराग हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक महितीवरुन पळून गेलेल्या अनुराग पांडे याला सात महिन्यानंतर अखेर पोलिसंनी अटक केली. चौकशीत त्याने या महागड्या कॅमेरा, लेन्स आणि इतर साहित्याचा अपहार केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून हा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.