कौटुंबिक वादातून वयोवृद्ध निवृत्त शिक्षकावर प्राणघातक हल्ला
पुतण्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा तर आरोपी पत्नीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – कौटुंबिक वादातून रणजीतराय भगवानजी देसाई या वयोवृद्ध निवृत्त शिक्षकावर त्यांच्या नातेवाईकांनी बेल्टसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात रणजीतराय यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या आधी कांदिवलीतील शताब्दी तर नंतर द्वारका या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्या पुतण्या निहार देसाई आणि त्याची पत्नी मालती निहार देसाई यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दहा दिवसांपासून वॉण्टेड असलेल्या मालती देसाई हिला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
79 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रणजीतराय हे गोरेगाव येथील एम. जी रोड, तिलकनगर रोडच्या गणेश सदन सोसायटीमध्ये राहतात. 2005 साली ते महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते मूळचे गुजरातचे वापीचे रहिवाशी असून त्यांच्या मालकीची जमिन आहे. या जमिनीवर ते स्वत शेती करतात. अनेकदा ते शेतीच्या कामासाठी गावी जातात. 17 डिसेंबरला शेतीचे काम संपवून ते गोरेगाव येथील त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घराच्या बाहेरील कॅमेरा तुटलेला सिला. त्यामुळे त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर ते त्यांच्या घरी प्लंबर कामासाठी त्यांच्या परिचित प्लंबरला घेऊन जात होते. यावेळी त्यांच्या भावाचा मुलगा निहार आणि त्याची पत्नी मालती यांनी त्यांना तिथे येण्याचे कारण विचारुन धक्काबुक्की केली. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी त्यांना ब्लेटसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. पुन्हा तिथे यायचे नाही अशी धमकी देऊन ते दोघेही पळून गेले होते. या हल्ल्यात रणजीतराय हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले, उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
घडलेला प्रकार त्यांनी नंतर गोरेगाव पोलिसांना सांगून त्यांच्या पुतण्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत निहार देसाई आणि मालती देसाई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या मालतीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात निहार आणि रणजीतराय यांच्या कुटुंबात वाद असून याच वादातून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.