हायड्रोजन फुग्याचा स्फोटात आग लागून तरुणीसह दोनजण जखमी
गोरेगाव येथील निवासी लिफ्टमधील घटनेने भीतीचे वातावरण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – वाढदिवसानिमित्त हायड्रोयन फुगे घेऊन जाताना लिफ्टमध्ये फुग्याचा अचानक स्फोट होऊन आग लागली आणि त्यात एका तरुणीसह दोनजण जखमी झाले होते. हिमानी टाप्रिया आणि राजकुमार महतो अशी या दोघांची नावे असून त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हायड्रोजन फुगे विक्री करणारा मालक टी. के जैयस्वाल या मालकाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गोरेगाव येथील एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता गोरेगाव येथील अनमोल टॉवर अपार्टमेंटमध्ये घडली. याच इमारतीमध्ये हिमानी ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. सोमवारी तिच्या कुटुंबातील एका सदस्याचा वाढदिवस होता. त्यासाठी तिने जवळच असलेल्या एका शॉपमधून हायड्रोजन फुगे मागवले होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता शॉपमधून डिलीव्हरी बॉय राजकुमार महतो हा दहा ते बारा मोठे हायड्रोजन फुगे घेऊन आला होता. फुगे घेऊन ते दोघेही लिफ्टमधून घरी जात होते.
मात्र लिफ्टमध्ये प्रवेश करताच अचानक फुग्याचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत ते दोघेही जखमी झाले होते. हा संपूर्ण प्रकार लिफ्टमधील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. सुदैवाने लिफ्ट उघडी असल्याने ते दोघेही लगेचच बाहेर पडले होते. नाहीतर तिथे मोठी दुर्घटना घडली असती असे फुटेजवरुन दिसून आले. जखमी दोघांनाही तातडीने स्थानिक रहिवाशांनी जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हिमांनीच मानेला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने तिथे तिच्यावर उपचार सुरु आहे तर राजकुमारला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते.
हिमानी ही अलीकडेच सुरतहून मुंबईत आली होती. तिच्या मावशीचा वाढदिवस असल्याने ती हायड्रोजन फुगे घेऊन घरी जात होती. यावेळी ही दुर्घटना घडली. ही माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हिमानीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शॉपमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून शॉपमालकाला पोलिसांकडून नोटीस बजाविण्यात आली आहे.