मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जानेवारी २०२५
मुंबई, – सोळा वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर तिच्याच काकाने लैगिंक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी काकाविरुद्ध वनराई पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पिडीत पुतणी गरोदर राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पिडीत मुलगी ही गोरेगाव परिसरात राहत असून आरोपी हा तिचा काका आहे. तो त्यांच्यासोबत तिच्या घरात राहत होता. १ जानेवारी २०२४ रोजी घरात कोणीही नसताना त्याने दरवाजा बंद करुन तिच्या छातीसह अंगावरील इतर ठिकाणी नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने भीतीपोटी हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मे महिन्यांत आईस्क्रिम आणि दूधात गुंगीचे देऊन तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. जे. जे हॉस्पिटलमध्ये मेडीकल केल्यानंतर पिडीत मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तिची चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता.
ही माहिती नंतर वनराई पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या काकाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेला आहे. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.