मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – गोरेगाव येथे एका 22 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एका निवासी इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने 45 व्या मजल्याच्या रिफ्युजी एरियावरुन उडी घेऊन जीवन संपविले. अनंत द्विवेदी असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडले नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी आरे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.
ही घटना सोमवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास गोरेगाव येथील ओबेरॉय स्क्वेअर इमारतीच्या सी विंगच्या 45 व्या मजल्याच्या रिफ्युजी एरियाच्या मजल्यावर घडली. या ठिकाणी सोमवारी साडेबारा वाजता एक तरुण रिक्षातून आला होता. त्याला सुरक्षारक्षकाने हटकले असता त्याने तो 45 झिरो तीनमध्ये राहतो. त्याच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नाही, त्यामुळे वडिलांकडून पैसे घेऊन येतो असे सांगितले. त्यानंतर सुरक्षारक्षकाने त्याला आत प्रवेश दिला होता. पाऊणच्या सुमारास तो सी विंगच्या 45 व्या मजल्यावर गेला आणि त्याने तेथील रिफ्युजी एरियातून उडी घेतली होती.
हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरे पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या तरुणाला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलवरुन त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृत तरुणाचे नाव अनंत द्विवेदी असून तो 22 वर्षांचा आहे. त्याच्याकडे पोलिसांना कोणतीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
अनंत हा याच परिसरात दोन ते तीन वेळा आला होता. त्याला काही सुरक्षारक्षकांनी यापूर्वीही पाहिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो तिथे आत्महत्या करण्याच्या उद्देशानेच आला होता असे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच इमारतीमधून एका तरुणीने अशाच प्रकारे रिफ्युजी एरियामधून उडी घेऊन 45 व्या मजल्यावरुन आत्महत्या केली होती. चालू वर्षांतील ही दुसरी घटना आहे.