मित्राच्या मानसिक शोषणाला कंटाळून सतरा वर्षांच्या मुलीची आत्महत्या
अश्लील फोटो व्हायरलची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मित्राच्या मानसिक शोषणाला कंटाळून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या मित्राविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी केल्याचा आरोपी मित्रावर आरोप आहे. या घटनेची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
42 वर्षांचे तक्रारदार गोरेगाव येथे राहत असून त्यांचा चटई विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना वीस वर्षांचा मुलगा तर सतरा आणि बारा वर्षांचे दोन मुली आहेत. त्यांची सतरा वर्षांची मुलगी शबाना (नावात बदल) ही गोरेगाव येथील एका उर्दु शाळेत नववीत शिकत होती. 19 ऑगस्टला हिना ही घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. तिला सर्वत्र शोध घेऊन ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी तिची मिसिंग तक्रार केली होती. तिचा शोध सुरु असताना ती तिच्या चेन्नईतील मैत्रिणीकडे सापडली होती. त्यानंतर मैत्रिणीच्या भावाने तिला चेन्नईहून मुंबईत पाठविले होते. मुंबईत आल्यानंतर तिच्या पालकांनी तिची चौकशी केली होती.
यावेळी तिने त्याच परिसरात राहणार्या एका तरुणासोबत तिची मैत्री असल्याचे सांगितले होते. ते दोघेही त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात होते, व्हॉटअपवर चॅट करत होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांच्या पत्नीने तिला त्याच्याशी संपर्क ठेवू नकोस अशी सक्त ताकिद दिली होती. याच दरम्यान त्यांच्या घरातून पैसे चोरीस जात असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार त्यांच्या पत्नीच्याही लक्षात आला होता. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. एक आठवड्यापूर्वी हिना ही तिच्या मित्रांशी रात्री उशिरापर्यंत व्हॉटअपवर असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने हिनाकडे विचारणा केली होती.
तिला ओरडताच तिने तिच्या मित्राने तिला काही अश्लील मॅसेज पाठविले असून तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तो तिच्याकडे पैसे मागत आहे याबाबत विचारणा केली. यावेळी तिने घरातून अनेकदा एक, दोन आणि पाच हजार रुपये चोरी करुन मित्राला उधार म्हणून दिल्याचे सांगितले. मात्र तिच्या बोलण्यावर तिला संशय आला होता. त्यामुळे तिने तिची आपुलकीने चौकशी केली होती. यावेळी तिने तिच्या मित्राने एका कार्यक्रमांत तिचे काही फोटो काढले होते. ते फोटो एडिट करुन तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले.
ही माहिती ऐकल्यानंतर तिच्या आईला धक्काच बसला होता. हा प्रकार समजताच तिने गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला योग्य ती समज देऊन हिनाला पुन्हा संपर्क न साधण्याचा तसेच तिच्यापासून दूर राहण्याची समज दिली होती. मात्र या घटनेनंतर हिना ही प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून शनिवारी 15 नोव्हेंबरला हिनाने तिच्या राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर तिच्या पालकांना समजताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
या माहितीनंतर गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हिनाला पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी हिनाचे वडिलांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपी मित्राविरुद्ध हिनाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करुन मानसिक शोषण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.