लग्नाच्या गडबडीत मित्रानेच केली सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई

चोरीप्रकरणी आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जानेवारी 2026
मुंबई, – लग्नाच्या गडबडीत मित्रानेच घरी हातसफाई करुन सुमारे साडेबारा लाखांचे सोन्याचे दागिने पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी मित्र अजय पटेल याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केली आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी त्याने त्याच्या राहत्या घरातील कपाटातून आधी सोन्याचे दागिने आणि नंतर त्याच्यासह त्याच्या एटीएम कार्ड चोरी करुन सुमारे सव्वालाख रुपयांचा अपहार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मित्रानेच घात केल्याचे लक्षात तक्रारदारासह त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

चैतन्य राजेश झव्हेरी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील जवाहरनगर रोड क्रमांक आठ, प्रभा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा स्वतचा एब्रायडेरीचा व्यवसाय आहे. 18 डिसेंबर 2022 रोजी त्यांचे दिप्ती नावाच्या एका तरुणीशी साखरपुडा होता. त्यासाठी त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांसोबत नातेवाईक आणि मित्रमंडळी आले होते. त्यात अजय पटेल याचा समावेश होता. हळदीचा कार्यक्रम सुरु असताना चैतन्य यांची आई माधवी हिने कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला कपाटात सोन्याचे सापडले नाही. त्यामुळे तिने चैतन्यला ही माहिती दिली होती. त्यांनी कपाटात सर्वत्र दागिन्यांची पाहणी केली, मात्र बराच शोध घेतल्यानंतरही त्यांना त्यांचे तीन सोन्याची चैन आणि दोन कडे असा साडेबारा लाख रुपयांचे दागिने सापडले नाही.

लग्नाच्या गडबडीत नंतर ते सर्वजण दागिन्यांविषयी विसरुन गेले होते. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना पैशांची गरज होती, त्यामुळे ते त्यांच्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. तिथे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएममधून पैसे निघाले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मिनी स्टेटमेंट काढले. त्यात त्यांना त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यात वीस हजार काढण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्यासह त्यांच्या आईच्या एटीएमचा वापर करुन कोणीतरी त्यांच्या बँक खात्यातून सुमारे सव्वालाख रुपये एटीएममधून काढल्याचे दिसून आले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करुन त्यांचे एटीएम कार्ड ब्लॉक केले होते. हा प्रकार त्यांनी सहजच अजय पटेलला सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार करणार असल्याचे सांगितले. चैतन्य पोलिसात तक्रार करणार असल्याचे समजताच त्याने त्यांच्यासह त्यांच्या आईचे एटीएम कार्ड घेऊन ही रक्कम काढल्याची कबुली दिली. ही माहिती ऐकून चैतन्य यांना धक्काच बसला होता. अजय हा त्यांचा अत्यंत जवळचा मित्र होता, अनेकदा तो त्यांच्या घरी होता, त्यांच्या लग्नातही तो त्यांच्या घरी होता. त्यामुळे त्यानेच त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्याची चौकशी सुरु केली होती.

त्याने या चोरीबाबत काहीही सांगण्यास नकार देताना त्याचा चोरीमागे काहीही संबंध नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर या चोरीमागे कोण आहे याचा उलघडा होईल असे सांगताच तो पुन्हा घाबरला आणि त्यानेच लग्नाच्या गडबडीत कपाटातून साडेबारा लाखांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. सोन्याचे दागिन्यांसह सव्वालाखांची कॅश डिसेंबर 2025 पर्यंत परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने त्यांच्याकडे मुदत मागून घेतली होती.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिने आणि कॅश परत केली नाही. त्यामुळे चैतन्य झव्हेरी यांनी गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अजय पटेलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. चोरी केलेले दागिने कुठे आहे, या दागिन्यांची त्याने विक्री केली आहे का, ते दागिने कोणाला विकले आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page