चोर समजून 26 वर्षांच्या तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच चार आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – चोर समजूत एका 26 वर्षांच्या तरुणाची चारजणांच्या टोळीने हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. हर्षल रामसिंग परमा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी चारही आरोपींना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. हत्येच्या याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी पहाटे तीन ते सकाळी सातच्या सुमारास गोरेगाव येथील तीनडोंगरी, भारत हॉटेलसमोरील सुभाषनगर, राज पॅथ्रोन इमारतीमध्ये घडली. सुवर्णा रामसिंग परमा ही 61 वर्षांची वयोवृद्ध महिला तिचे पती रामसिंग आणि मुलगा हर्षल यांच्यासोबत गोरेगाव येथील मोतीलाल नगर क्रमांक दोन, आदिवासी सोसायटीच्या ए विंगच्या 4/602 मध्ये राहते. मोठा मुलगा नरेश हा त्याच्या कुटुंबियांसोबत स्वतंत्र तर विवाहीत मुलगी तिच्या पतीसोबत उल्हासनगर येथे राहते. तिचे पती रामसिंग हे बांगुरनगर येथील वसंत गॅलेक्सी इमारतीमध्ये असलेल्या जलतरण तलावाचे लाईफगार्ड म्हणून काम करतात. शनिवारी रात्री बारा वाजता तिचा मुलगा हर्षल हा दारु पिण्यासाठी बाहेर जातो असे सांगून घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही, त्यामुळे ती झोपून गेली होती.
रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता तिच्या घरी गोरेगाव पोलिसांचे एक पथक आले होते. त्यांनी गोरेगाव येथील राज पॅथ्रोन इमारतीमध्ये तिचा मुलगा हर्षलला काही लोकांनी मारहाण केली होती, त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यांनतर सुवर्णा ही तिचा पती रामसिंग यांच्यासोबत ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये गेली होती. यावेळी तिला हर्षलला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात हर्षल हा रात्री उशिरा राज पॅथ्रोन इमारतीजवळ गेला होता. यावेळी त्याला चोर समजून काही लोकांनी पकडले होते. तिथे त्याचे हातपाय बांधून चारजणांच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
हा प्रकार इमारतीचा सुरक्षारक्षक पप्पू दूधनाथ यादव याच्याकडून समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या हर्षलला ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्याची नंतर ओळख पटली होती. त्यानतर त्याच्या हत्येची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली होती. याप्रकरणी सुवर्णा परमा हिच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघांनाही पोलिसांनी अटक केली.
तपासात ते चौघेही राज पॅथ्रोन इमारतीमध्ये काम करतात, दिवसा काम करुन ते सर्वजण याच इमारतीमध्ये झोपत होते. शनिवारी पहाटे तीन वाजता त्यांना हर्षल तिथे संशयास्पद फिरताना दिसून आला, त्यांना तो चोर असल्याचा संशय आला होता. त्यामुळे हर्षलला त्यांनी पकडून इमारतीमध्ये घेऊन गेले. तिथे त्याला बांधून त्यांनी बेदम मारहाण केलीह होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर चार आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.