मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – वरळीतील राहत्या घरी शनिवारी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पत्नी गौरी अनंत गर्जे हिचा पती आणि पंकजा मुंडे यांचा खाजगी स्वीय सहाय्यक अनंत भगवान गर्जे याच्या पोलीस कोठडीत लोकल कोर्टाने वाढ केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने अनंतला पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी गौरीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसून आल्या असून या जखमांबाबत चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. विशेष म्हणजे अनंतच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या वाढीच्या मागणीला विरोध केला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे.
मूळची बीडची रहिवाशी असलेली गौरी हिचे फेब्रुवारी 2025 रोजी अनंत गर्जेशी विवाह झाला होता. विवाहानंतर गौरी ही अनंतसोबत वरळीतील नवीन बीडीडी वसाहतीत राहण्यासाठी आली होती. याच दरम्यान तिला अनंतचे एका महिलेशी संबंध असल्याचे तसेच त्याच्यापासून ती गरोदर असल्याची माहिती समजली होती. या माहितीनंतर ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने शनिवारी तिच्या वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर तिचे वडिल वडिल अशोक मारुती पालवे यांनी गौरीच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला होता.
गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप करुन त्यांनी तिच्या पतीसह नणंद आणि दिराविरुद्ध वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर तिचा पती अनंत भगवान गर्जे, नणंद शितल भगवान गर्जे आणि दिर अजय भगवान गर्जे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी अनंतची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी दुपारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी सरकारी वकिलांनी गौरीच्या शरीरावर जखमांच्या खुणा असून त्या तपासण्याची गरज आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करुन मिळावी अशी मागणी केली.
त्याला अनंतच्या वकिलांनी विरोध दर्शविला नाही. त्यांनी सत्य बाहेर येण्यासाठी अनंत गर्जे यांनी पोलिसांना नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत मंगळवार 2 डिसेंबरपर्यंंत वाढ करण्यात आली.