महिला पोलीस शिपायाच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा

चुकीच्या इंजेक्शमुळे मृत्यू झाल्याचा आरोप; एडीआरची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२४
मुंबई, – मरोळ येथील ल विभागातील महिला पोलीस शिपाई गौरी सुभाष पाटील हिचा गुरुवारी रात्री अंधेरीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑपरेशनपूर्वी भूल देण्यासाठी देण्यात आलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे गौरीची प्रकृती बिघडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याने गौरीचा मृत्यू झाल्याचा आरोप असून तिच्या निधनाने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे. दरम्यान गौरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या रिपोर्टनंतर तिच्या मृत्यूच्या कारणाचा अधिकृत खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२०१७ ब्रॅचची गौरी ही मरोळ येथील ल विभागातील चारमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. सध्या ती कांदिवलील समतानगर, सरोवर टॉवरच्या पन्हाळा सोसायटीच सी/२/३०३ मध्ये राहत होती. गेल्या काही दिवसांपासून तिला कानात प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे कानाच्या ऑपरेशनसाठी ती अंधेरीतीललोखंडवाला संकुल, वास्तू लेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असलेल्या ऍक्सिस दाखल झाली होती. तिथेच तिच्यावर ऑपरेशन होणार होते. ऑपरेशनपूर्वी तिला भूल देण्यात आले होते. चुकीच्या इंजेक्शनमध्ये तिची प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तिथेच उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून आंबोली पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश वळवी, पोलीस उपनिरीक्षक क्षितीजकुमार कोगे व अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. चुकीच्या इंजेक्शमुळेच गौरीचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तिचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर गौरी पाटील हिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गौरीच्या मृत्यूची माहिती नंतर तिच्या पालकांसह पोलीस उपायुक्त आणि ल विभागाचे पोलीस निरीक्षक अजय क्षीरसागर यांना देण्यात आल होती. गौरीचे वडिल सुभाष पाटील, भाऊ विनायक पाटील हे उपस्थित होते. त्यांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालात चुकीच्या उपचारामुळे गौरी हिचा मृत्यू झाल्याचे उघड होताच संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान अवघ्या २८ व्या वर्षी गौरीच्या मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page