मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जून 2025
मुंबई, – बेस्ट बसच्या चाकाखाली आल्याने बरकत चाँद शेख या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालक राजेश नागू होळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात शनिवारी 7 जूनला रात्री सव्वानऊ वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, 90 फिट रोड, संत निरंकारी भवन, नवीन बस डेपोकडे जाणार्या वाहिनीवर झाला. मोहम्मद अमीन चाँद मुल्ला शेख हा गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत असून तो सेल्समन म्हणून काम करतो. याच परिसरातील रफिकनगर, बाबानगरात त्याचा मृत बरकत नावाचा भाऊ त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो बिगारी कामगार म्हणून कामाला आहे. शनिवारी तो बसने त्याच्या घरी जात होता.
संत निरंकारी भवन, नवीन बस डेपोकडे जाणार्या वाहिनीवर बसच्या पुढच्या टायरच्या मागे पाय घसरुन तो खाली पडला होता. यावेळी बसच्या मागच्या टायरखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यता आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बसवाहक अजय हनुमंत नांदे याच्या
चौकशीदरम्यान चालकाचे नाव राजेश होळ असल्याचे उघडकीस आले. तो शिवाजीनगर नवीन बस डेपोमध्ये काम करत होता. याप्रकरणी मोहम्मद अमीन याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बसचालक राजेश होळ याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.