मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – साकिनाका येथून गोवंडीतील राहत्या घरी भाच्यांना सोडण्यासाठी जाताना चौघांवर काळाची झडप पडली. त्यात पिता-पूत्रासह दोन्ही भाच्यांचा डंपर अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये सात ते अकरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या डंपरचालकाला काही तासांत शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोल केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरातील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती, अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा आणि वाहतूक सेवा पूर्वपदावर आली. या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मृतांमध्ये पिता-पूत्रांसह दोन भाच्याचा समावेश आहे. नूरमोहम्मद गालन (41), आर्यन नूरमोहम्मद गालन (11), मोहम्मद हुसैन खान (11) आणि अब्दुल गनी खान (9) अशी अपघातात मृत्यू झालेल्या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजता गोवंडीतील शिवाजीनगर जंक्शन, शिवाजीनगर सर्कल परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगतले. नूरमोहम्मद हे साकिनाका परिसरात राहत असून आर्यन हा त्यांचा मुलगा तर अब्दुल आणि मोहम्मद हुसैन हे त्याचे भाचे आहेत. शनिवारी सायंकाळी नूरमोहम्मद त्यांच्या मुलासह दोन्ही भाच्यासोबत त्यांच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील घरी सोडण्यासाठी आले होते. ते चौघेही दोन वेगवेगळ्या बाईकवरुन साकिनाका येथून गोवंडीच्या दिशेने जात होते. ही बाईक शिवाजीनगर जंक्शनजवळ येताच भरवेगात जाणार्या एका डंपरने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात ते चौघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी नूरमोहम्मद व त्यांचा मुलगा आर्यन यांना राजावाडी तर मोहम्मद हुसैन आणि अब्दुल खान या दोघांना गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल आले होते. तिथे चौघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
डंपर अपघातात तीन अल्पवयीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी स्थानिक रहिवाशी जमा झाले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत असून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावरच रास्ता रोको केले होते. जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग झाले होते. रास्ता रोकोमुळे वाहतूक सेवेवर प्रचंड परिणाम झाला होता. अखेर पोलिसांना रास्ता रोको करणार्या स्थानिक रहिवाशांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. लोकांना बाजूला केल्यानंतर परिसरातील वाहतूक सेवा पूर्वपदावर आली होती.
अपघातानंतर डंपरचालक पळून गेला होता. त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून तीन मुलांसह चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.