मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – कामावर जाणार्या एका वयोवृद्धाचा भरवेगात जाणार्या टेम्पोच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी गोवंडीतील बैंगनवाडी सिंग्नलजवळ घडली. मोहम्मद हबीब मदारहबक्ष शेख असे या 68 वर्षीय वयोवृद्धाचे नाव असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध देवनार पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसाकडून शोध सुरु आहे.
हा अपघात गुरुवारी 2 एप्रिलला सकाळी सहा वाजता गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, घाटकोपरकडे जाणार्या वाहिनीवरील बैंगनवाडी सिग्नलजवळ झाला. शहनजर मोहम्मद हबीब शेख ही महिला गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहते. मृत मोहम्मद हबीब तिचे पती असून ते सिमेंटच्या गाडीवर बिगारी कामगार म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र मोहम्मद सजाद शेख हादेखील होता. सकाळी सहा वाजता ते दोघेही बैंगनवाडी सिग्नलजवळ उभे होते. यावेळी भरवेगात जाणार्या एका टेम्पोने मोहम्मद हबीब यांना धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.
अपघातानंतर टेम्पोचालक त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. अपघातानंतर मोहम्मद सजादने त्यांना रिक्षातून शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी शहनजर शेख हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्यामुळे परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपी टेम्पोचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मोहम्मद हबीबच्या अपघाताची निधनाने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.