मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – आईच्या मैत्रिणीच्या मुलीला दुसर्या तरुणासोबत फिरताना पाहिल्याची माहिती घरी सांगितली म्हणून रागाच्या भरात आरोपी मित्राने एका अठरा वर्षांच्या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. या हल्ल्यात अरमान शाहबाज खान हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्या कानाला, डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी अकबर मुनावर अन्सारी ऊर्फ जाहिद याच्याविरुद्ध हत्येसह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली. अरमान हा त्याच्या कुटुंबियांसोबत रफिकनगर पार्ट दोन, बावे रहमत मशिदीजवळील गल्ली क्रमांक एकमध्ये राहतो. त्याच्या वडिलांचा टिव्ही रिपेरिंगचा व्यवसाय आहे तर तो स्वत पाणी व कोल्डींग डिलीव्हरीचे काम करतो. त्याची आई रिझवाना हिची झरीना मुन्नावर अन्सारी ही मैत्रिण असून सबा ही तिची मुलगी आहे. सबा त्याची मैत्रिण असून तिला गुरुवारी त्याने जाहिदसोबत अहिल्याबाई होलकर मार्गावर फिरताना पाहिले होते. ही माहिती त्याने सबाचा भाऊ तसव्वर ऊर्फ तस्सू याला सांगितली. घरी ही माहिती समजताच झरीनाने अरमानला दुसर्या दिवशी तिच्या घरी बोलाविले होते. त्यामुळे अरमान हा त्याच्या आईसोबत शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तिच्या घराजवळ गेला होता. याच दरम्यान तिथे जाहिद आला आणि त्याने त्याच्या हातातील चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला हाताला आणि कानाला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार तिथे उपस्थित लोकांच्या निदर्शनास येताच जाहिदने त्यांना चाकूचा धाक दाखवून पोलिसांत तक्रार केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी देऊन तेथून पलायन केले.
जखमी झालेल्या अरमानला नंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अरमानची जबानी नोंदवून पोलिसांनी अकबर अन्सारीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.