गोवंडीत पूर्ववैमस्नातून दोन बंधूंवर चाकूने प्राणघातक हल्ला

एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून दोन बंधूंवर चारजणांच्या एका टोळीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात शहाबाजअली या भावाचा मृत्यू झाला तर सिरताजअली हा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी देवनार पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध हत्या, हत्येच्या प्रयत्नासह अन्य भादवी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. चॉंद सावत, शोएब शेख, मोहम्मद अफजल आणि सलीम खान अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता गोवंडीतील डॉ. झाकीर हुसैन नगर, डॉग हॉस्पिटलसमोरील डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम उद्यानात घडली. अरमान यारमोहम्मद सावत हा मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर, जोगिया उदयपूरचा रहिवाशी असून सध्या तो गोवंडीतील डॉ. झाकीर हुसैन नगर, गाझिया कंपाऊंड चाळीत राहतो. शहाबाजअली आणि सिरताजअली हे दोघेही त्याचे भाऊ असून ते सर्वजण एकत्र राहतात. याच परिसरात चारही आरोपी राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी सायंकाळी शहाबाजअलीचे चॉंद सावतसोबत क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीनंतर त्यांच्यात प्रचंड वाद झाला आणि त्यातून त्याने शहाबाजअलीला बेदम मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या अरमान आणि सिरताजअलीला चॉंदसह त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी मारहाण केली होती. काही वेळानंतर त्याने सिरताजअली आणि शहाबाजअलीवर चाकूने वार केले होते. छातीत गंभीर दुखापत झाल्याने शहाबाजअली जागीच कोसळला आणि सिरताजअलीच्या पायाला चाकूने वार केल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. या हल्ल्यानंतर चॉंद व त्याचे तिन्ही सहकारी तेथून पळून गेले.

जखमी झालेल्या या दोघांनाही गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे शहाबाजअलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सिरताजअलीला पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अरमान सावत याची पोलिसांनी जबानी नोंदवून त्याच्या तक्रारीवरुन चॉंद सावत, शोएब शेख, मोहम्मद अफजल आणि सलीम खान यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामारी, जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवीसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page