पूर्ववैमस्नातून अठरा वर्षांच्या तरुणाची चौघांकडून हत्या
गोवंडीतील घटना; तीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून अहमद मोहम्मद सईद पठाण या १८ वर्षांच्या तरुणाची तीन अल्पवयीन मुलासह चारजणांच्या टोळीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मारेकरी मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या तिघांनाही बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांतील हफिजउल्ला खान ऊर्फ बुट्टू हा मुख्य आरोपी असून हत्येनंतर तो पळून गेला असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, पिण्याच्या पाण्याच्या टाकीवजळील प्लॉट क्रमांक २५ मध्ये घडली. याच परिसरात सगीर मोहम्मद सईद पठाण हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून चालक म्हणून काम करतो. मृत अहमद हा त्याचा लहान भाऊ असून तो काहीच कामधंदा करत नाही. चारही आरोपी त्याच परिसरातील रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा राग हफिजल्ला खान याच्या मनात होता. त्यानेच इतर तीन अल्पवयीन मुलावर त्याच्यावर हल्ला करण्यास सांगितले होते. त्यानंतर या तिन्ही मुलांनी प्लॉट क्रमांक २५ जवळ अहमदशी जुन्या भांडणाचा वाद काढून त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या मानेला, पाठीला, डोक्याला, कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या अहमदला स्थानिक रहिवाशांनी तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दिपक कडधाने व अन्य पोलीस पथकाने धाव घेतली होती. याप्रकरणी सगीर पठाण याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध १०३ (१), ६१ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम ३७ (१), (ए), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही मारेकरी अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत हफिजल्ला खान याचे नाव समोर आले होते. त्यानेच अहमदवर हल्ला करण्यास सांगितले होते. हल्ल्यानंतर तो पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही मुलांना नंतर बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.