मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – बहिणीची छेड काढली म्हणून मुर्तुझा ऊर्फ नवाज मुबारक शेख या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच परिचित तरुणाने लाथ्याबुक्यांनी तसेच डोके जमिनीवर आपटून हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सैयब अल बदुद्दीन सावंत या आरोपीस गोवंडी येथून देवनार पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.
ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजता गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, डॉ. झाकीर हुसैन नगर, बबलू किराणा दुकानाजवळ घडली. याच परिसरात साबीर हयातउल्ला शेख हा 23 वर्षांचा तरुण त्याच्या कुटुंबियासोबत राहत असून मृत नवाज हा त्याचा भाचा आहे. सैयब हादेखील याच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. काही दिवसांपूर्वी सैयबच्या बहिणीची नवाजने छेड काढली होती. त्यामुळे नवाजला बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला होता. त्यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचा राग आल्याने त्याने नवाजला बेदम मारहाण केली होती. त्याचे डोके आपटून, त्याच्या चेहर्यावर लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात नवाज हा गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर सैयब हा तेथून पळून गेला होता.
हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी जखमी झालेल्या नवाजला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी साबीर शेख याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर सैयबविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मोकाटे, सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी सैयबला गोवंडी येथून अटक केली. चौकशीत त्याने बहिणीची छेड काढली म्हणून नवाजची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.