स्वतच्या सहा महिन्यांच्या मुलाची जन्मदात्या मातेकडून हत्या
हत्येनंतर आरोपी मातेचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – स्वतच्याच सहा महिन्यांची मुलाची जन्मदात्या मातेने उशीने तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी परिसरात घडली. या हत्येनंतर आरोपी माता सुल्ताना अब्दुल खान हिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण करुन तिच्या सहा महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. आर्थिक परिस्थिती आणि मुलाला गंभीर आजाराची लागण झाल्याने तिने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी 31 जुलैला सायंकाळी सव्वासात वाजता गोवंडीतील बैंगनवाडी, काशिमिया हॉस्पिटलजवळील प्लॉट क्रमांक सोळामध्ये घडली. याच परिसरातील लाईन क्यू, रुम क्रमांक सहामध्ये सुल्ताना ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला एक सहा महिन्यांचा मुलगा होता. आर्थिक परिस्थितीमुळे तिला तिच्या मुलाचा सांभाळ करता येत नव्हता. त्यातच तिच्या मुलाला एक गंभीर आजाराची लागण झाली होती. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी तिने तिच्याच सहा महिन्यांची उशीने तोंड दाबून हत्या केली होती.
या हत्येनंतर ती पोलीस ठाण्यात आली आणि तिने तिच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिच्या मुलाला पोलिसांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुषमा शामराव गायकवाड यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी सुल्ताना खान हिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच शुक्रवारी सकाळी तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मदात्या मातेनेच तिच्या सहा महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याच्या वृत्ताने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.