मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) – तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून भावाच्या अटकेचा सूड घेण्यासाठी एका 26 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने गळ्यावर वार करुन हत्या केली. अस्लम छोटू कुरेशी असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी नाझीम या आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांत नाझीमला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना सोमवारी रात्री साडेबारा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, लोटस कॉलनीतील जोहर स्कूलजवळील मैदानात घडली. याच परिसरातील लोटस कॉलनीत आस्मा छोटू कुरेशी ही 29 वर्षांची महिला राहते. तिला तीन भाऊ असून त्यापैकी अस्लम हा लहान आहे. तो क्लिनर म्हणून कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी अस्लमला क्षुल्लक कारणावरुन त्याच्याच परिचित समीर आणि वसीम यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वसीम आणि सलीम या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून वसीमचा भाऊ नाझीमचा अस्लमवर राग होता. त्याच्या तक्रारीनंतर त्याच्या भावावर अटकेची कारवाई झाली होती. त्यामुळे त्याला त्याचा सूड घ्यायचा होता.
सोमवारी रात्री साडेअकरा वाजता अस्लम हा जोहर स्कूलजवळील मैदानात त्याच्या मित्रांसोबत होता. यावेळी तिथे नाझीम आला आणि त्याने जुना वाद काढून त्याच्याशी भांडण सुरु केले होते. या भांडणादरम्यान त्याने त्याच्याकडील चाकूने अस्लमच्या गळ्यावर वार केले होते. त्यात अस्लम हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर नाझीम तेथून पळून गेला. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या अस्लमला स्थानिक रहिवाशांनी तातडीने नूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान अस्लमचा मृत्यू झाला.
ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी अस्लमच्या मित्रांच्या जबानीवरुन तसेच आस्माने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नाझीमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच नाझीम हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.