मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 डिसेंबर 2025
मुंबई, – क्षुल्लक कौटुंबिक वादातून नाजिया परवीन या 20 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पती मंजर इमाम हुसैन (23) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दोन वर्षांपूर्वी नाजिया परवीन आणि मंजूर हुसैन यांचा प्रेमविवाह झाला होता, विवाहानंतर काही दिवसांत त्यांच्यात वाद उडत होते, याच वादाचे पर्यावसान नाजिया परवीनच्या हत्येत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा एक ते दिडच्या सुमारास गोवंडीतील बैंगनवाडी, प्लॉट क्रमांक 19/आर/3, रोड क्रमांक दहामध्ये घडली. समतुल्लाह दिलमोहम्मद शेख हे शेतकरी असून मूळचे उत्तप्रदेशचे रहिवाशी आहेत. त्यांची नाजिया परवीन ही पुतणी असून तिचे 20 ऑक्टोंबर 2023 रोजी मंजूर हुसैनशी पे्रमविवाह झाला होता. मंजूर हा नाजियाच्या मावशीचा मुलगा असून दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर ते दोघेही मुंबईत राहण्यासाठी उत्तरप्रदेशातून निघून गेले होते. सध्या ते दोघेही गोवंडीतील बैंगनवाडीत राहत होते.
मुंबईत आल्यानंतर नाजिया परवीन हिचे मंजरसोबत क्षुल्लक कारणावरुन खटके उडत होते. तो इतर मुलीशी फोनवरुन बोलतो, तिचा मानसिक व शारीरिक शोषण करतो असे ती तिच्या कुटुंबियांना सांगत होती. मात्र तिचे कुटुंबिय त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. शुक्रवारी 19 डिसेंबरला रात्री उशिरा एक वाजता नाजिया परवीन आणि मंजर यांच्यात पुन्हा क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर तिचा मृत्यू झाला असून तुम्ही तातडीने मुंबईला या असे त्यांच्या नातेवाईकांनी फोनवरुन माहिती दिली होती.
या माहितीनंतर तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ते सर्वजण उत्तरप्रदेशातून मुंबईत येण्यास निघाले होते. प्राथमिक तपासात शुक्रवारी या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्याने नाजिया परवीनचे डोके भिंतीवर आपटून तिची हत्या केली होती. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे नाजिया परवीनचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर समतुल्लाह शेख यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मंजर हुसैनविरुद्ध क्षुल्लक वादातून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.