मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – शाळेच्या बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळी चोरी करुन पळून जाणार्या दोन आरोपींना कामगारांनी पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. शाहनवाज मोहम्मद शफीक मोमीन आणि मोहम्मद युसूफ मोहम्मद शमशेर चौधरी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गोवंडीतील रहिवाशी आहे. यातील शाहनवाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चारहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रदीप चंगा शर्मा हा मजुरीचे काम करत असून त्याच्या कुटुंबियांसोबत गोवंडीतील शिवाजीनगर, प्लॉट क्रमांक एक परिसरात राहतो. दोन दिवसांपूर्वी काम संपवून तो त्याच्या घरी गेला होता. काही वेळाने तिथे शहानवाज हा त्याच्या सहकार्यासोबत आला होता. या दोघांनी शाळेच्या बांधकामासाठी ठेवलेल्या लोखंडी सळ्या चोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी शानू याला त्याने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. यावेळी तिथे झालेल्या गोंधळानंतर इतर कामगार आले होते. या कामगारांनी पळून जाणार्या शाहनवाज आणि मोहम्मद युसूफ या दोघांना ताब्यात घेतले होते. पळून जाण्याच्या प्रयत्न करणार्या शाहनवाजने त्याच्याकडील चाकूने प्रदीप शर्माच्या हातावर वार केले. त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी शाहनवाज मोमीन आणि मोहम्मद युसूफ या दोघांना पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्यांनी शाळेच्या बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा हा मुद्देमाल लवकरच त्यांच्याकडून जप्त केला जाणार आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. शाहनवाजविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीसह जबरी चोरी, मारामारी, गंभीर दुखापतीसह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार गुन्ह्यांची नोंद आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.