घरी येण्यास नकार दिला म्हणून पत्नीसह सासूवर हल्ला

गोवंडीतील घटना; आरोपी पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून माहेरी निघून आलेल्या पत्नीने सासरी येण्यास नकार दिला म्हणून पतीने पत्नीसह सासूवर ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा गोवंडी परिसरात घडली. या हल्ल्यात कुमकुम राजेंंद्र यादव या २२ वर्षांच्या महिलेसह तिच्या आईला दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपी पतीला अटक केली आहे. रेहमान जल्लाउद्दीन अन्सारी (२३) असे या पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुमकुम ही गोवंडीतील बैंगनवाडी, भारतनगर मशिदीजवळील आदर्शनगरात राहते. रेहमान हा तिचा पती असून तो महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. सध्या तो मानखुर्द येथील भारतमाता स्टॉलजवळील अण्णाभाऊ साठे नगरात राहतो. या दोघांमध्ये काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. या वादानंतर त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांच्या घटस्फोटाची प्रकिया सुरु असून अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळे ती तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आली होती. रविवारी रात्री उशिरा रेहमान हा तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने तिला घरी येण्याचा आग्रह केला होता. मात्र तिने त्याच्यासोबत घरी जाण्यास नकार दिला होता. त्यातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी रागाच्या भरात रेहमानने जिवे मारण्याच्या उद्देशाने कुमकुमवर ब्लेडने प्राणघातक हल्ला केला. त्यात तिच्या आईने मध्यस्थी करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याच्या सासूवरही हल्ला केला होता. या हल्ल्यात कुमकुमच्या गालावर, गळ्यावर व तिच्या आईला उजव्या हाताला दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर रेहमान तेथून पळून गेला होता.

स्थानिक रहिवाशांना हा प्रकार समजताच त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती दिली. हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही मायलेकींनानंतर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले होते. याप्रकरणी कुमकुमच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती रेहमान अन्सारीविरुद्ध १०९, ११८ (२), ३५१ (३), ३५२ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रेहमानला त्याच्या मानखुर्द येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात रेहमानविरुद्ध जोगेश्‍वरी पोलीस ठाण्यात रॉबरीच्या एका गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षी त्याने त्याच्या सहकार्‍याच्या मदतीने ही रॉबरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page