प्रॉपटीसाठी ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मानसिक शोषण

गोवंडीतील घटना; आरोपी मुलासह सूनेविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – प्रॉपटीसाठी ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच मुलासह सूनेकडून मानसिक शोषण सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी मुलासह सूनेविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गोवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गणेश भगवान कांबळे आणि गौरी गणेश कांबळे अशी या पती-पत्नीची नावे आहेत. आईकडून मुलीला प्रॉपटी मिळू नये म्हणून मुलानेच पत्नीला तिच्या घरी पाठवून तिचा शिवीगाळ करुन मानसिक शोषणासह बघून घेण्याची धमकीचे सत्र सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सजाबाई भगवान कांबळे ही वयोवृद्ध महिला गोवंडीतील देवनार गाव, पांडुरंग ठाकूर चाळीत राहते. तिचे पती टेलिकॉम फॅक्टरीत कामाला होते. निवृत्तीनंतर २०१८ साली त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झोल होते. तिच्या मुलीच्या पतीचेही निधन झाल्याने ती तिच्या मुलासोबत तिच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून राहत आहे. तिचा मोठा मुलगा कांदिवली येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतो तर दुसरा मुलगा गणेश हा त्याची पत्नी गौरीसोबत देवनार चाळीत वेगळा राहतो. तिच्या पतीने तिथेच दोन रुम घेतले होते. त्यापैकी एका रुममध्ये ती तिच्या मुलीसोबत तर दुसर्‍या रुममध्ये गणेश हा गौरीसोबत राहतो. गणेशच्या लग्नानंतर त्याने तिच्याकडे लक्ष देणे सोडून दिले होते. तो तिचा सांभाळ करत नव्हता. तिला औषधोपचारासाठी पैसे देत नाही. त्यामुळे तिला तिच्या मुलीवर अवलंबून राहावे लागत आहे. ती तिची सर्व प्रॉपटी मुलीच्या नावावर करेल या भितीपोटी गणेश हा तिचा विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. रुमवर कब्जा करण्याच्या उद्देशाने त्याने त्याची पत्नी गौरी तिच्याकडे पाठविले होते. त्यानंतर गौरी ही तिच्या घरी बेकायदेशीरीत्या राहत असून विनाकारण शिवीगाळ करुन तिचा मानसिक शोषण करत होती. अनेकदा ती तिच्या अंगावर जाऊन तिला दमदाटी करण्याचा प्रयत्न करत होती. तिला अपमानास्पद वागणुक देऊन बघून घेण्याची धमकी देत होती. त्यामुळे तिने तिच्या मुलीला तिच्यासोबत राहण्यास बोलाविले होते.

मुलासह सूनेकडून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून तिने गोवंडी पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार केली होती. तरीही त्यांच्यात काहीच फरक पडला नव्हता. तक्रार करुनही त्यांच्याकडून तिचा मानसिक शोषण सुरु होता. त्यामुळे तिने गोवंडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सजाबाईचा मुलगा गणेश कांबळे आणि त्याची पत्नी गौरी कांबळे यांच्याविरुद्ध ३५२, ३५१ (२), ३२९ (४), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम कलम २४ ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page