मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून माहेरी आलेली पत्नी सासरी येत नाही म्हणून झालेल्या वादातून मध्यस्थी करणार्या सतरा वर्षांच्या अल्पवयीन मेहुणीला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. या हल्ल्यात ही मुलगी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी भावोजी ओवेश सलीम कुरेशी याला अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४५ वर्षांची तक्रारदार महिला ही गोवंडीतील शिवाजीनगर, रफिकनगर पार्ट दोन परिसरात राहते. याच परिसरात ओवेश हा राहत असून तो चालक म्हणून कामाला आहे. तिच्या मोठ्या मुलीचे ओवेशसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद होत होते. या भांडणाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. तिने पुन्हा घरी यावे यासाठी ओवेशकडून प्रयत्न सुरु होते. मात्र वारंवार समजूत घालूनही ती सासरी जाण्यास तयार नव्हती. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ओवेश हा पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी आला होता. यावेळी घरी जाण्यावरुन त्यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला होता. त्यांच्यातील वाद मिटविण्याचा तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलीने प्रयत्न केला होता. मात्र तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला म्हणून ओवेशने तिला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. तिला खाली पाडून तिच्या पाठीवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या प्रकारानंतर ओवेश तेथून पळून गेला होता.
हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेची जबानी नोंदवून पोलिसांनी तिचा जावई ओवेश कुरेशीविरुद्ध मारहाणीसह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या ओवेशला काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.