मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – गोवंडी येथे सूनेला भेटण्यासाठी आलेल्या एका चार्टंर्ड अकाऊंटची सुमारे 45 लाखांची कॅश पळविणार्या दोन बंधूंना गोवंडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. नितेश रामविलास महंतो आणि दिपककुमार रामविलास महंतो अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 36 लाख 35 हजार 600 रुपयांची चोरीची कॅश हस्तगत केली आहे. याच गुन्ह्यांत त्यांचा तिसरा बंधू राहुलकुमार रामविलास महंतो हा फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर दोन्ही बंधूंना बिहारहून पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तेजप्रकाश सोहनलाल डांगी हे वडाळा येथे राहत असून ते व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत. त्यांच्याकडे गेल्या आठ महिन्यांपासून नितेशकुमार कारचालक म्हणून कामाला होता. नितेश हा प्रामाणिकपणे काम करत असल्याने त्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. राहुलकुमार हा त्याचा चुलत भाऊ असून तो बेरोजगार होता. त्यामुळे त्यांनी त्याला नोकरीवर ठेवावे अशी विनंती नितेशकुमारने त्यांच्याकडे केली होती. त्यामुळे तेजप्रकाश यांनी राहुलकुमारला त्यांच्या कार्यालयात शिपाईची नोकरी दिली होती. त्यांच्याकडे स्टॅम्प ड्युटीसाठी 45 लाख रुपये होते. ही रक्कम त्यांनी त्यांचा मित्र प्रकाश झुनझुनवाला यांच्या अंधेरीतील घरी ठेवण्यासाठी दिले होते.
19 सप्टेंबरला ते नितेशकुमारसोबत काही कामानिमित्त न्यू कफ परेड येथे गेले होते. यावेळी सुमीत बिझनेस पार्कमध्ये त्यांची प्रकाश झुनझुनवाला यांची भेट झाली होती. या भेटीत त्यांनी त्यांचे 45 लाख रुपये घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी त्यांना 45 लाखांची कॅश दिली होती. त्यानंतर ते दोघेही गोवंडी येथे आले होते. त्यांच्या सूनेला एक मुलगी झाली होती. त्यामुळे तेजप्रकाश डांगी हे तिला पाहण्यासाठी रात्री आठ वाजता सूर्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्या कारमध्ये नितेशकुमार हा थांबला होता. त्यांनी कारमध्ये 45 लाख रुपयांची कॅश असल्याची माहिती सांगून त्याला लक्ष ठेवण्यास सांगितले होते. काही वेळानंतर ते कारजवळ आले होते. यावेळी त्यांना तिथे नितेशकुमार दिसला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला होता, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी राहुलकुमारला कॉल केला, मात्र त्याचाही मोबाईल बंद येत होता. या दोघांनी त्यांच्या कारमधील 500 रुपयांच्या 8400 तर 100 रुपयांच्या 3000 नोटा असा सुमारे 45 लाखांची कॅश घेऊन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोवंडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही नोकराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांचा कारचालक नितेशकुमार आणि शिपाई राहुलकुमार यांच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त रामराव ढिकले यांनी गंभीर दखल घेत गोवंडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ सहाच्या काही निवडक अधिकारी आणि कर्मचार्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत, पोलीस निरीक्षक क्षीरसागर, निलेश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदूलाल पाटील, मोकाटे, पोलीस उपनिरीक्षक गाडे, कंक, पोलीस हवालदार नागे, साळुंखे, जोशी, देसाई, चव्हाण, हंबीर, कोळी, देवकते, घाटगे, माळवी, काकडे, आठरे, राणे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
दोन्ही आरोपी नोकर बिहारचे रहिवाशी होते, त्यामुळे ते बिहारला पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे या टिमला मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहारला पाठविण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक माहितीवरुन सहा दिवस पाळत ठेवून बिहारला एका खाजगी वाहनाने प्रवास करणार्या नितेश महंतो आणि दिपककुमार महंतो या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत नितेशने चोरीची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी 36 लाख 35 हजार 600 रुपयांची कॅश हस्तगत केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.