अकाऊंटटच्या आत्महत्येप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाच्या आमिषानंतर आर्थिक फसवणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गोवंडी येथे राहणार्‍या संदीपकुमार सिताराम पासवान या ३२ वर्षांच्या अकाऊंटटच्या आत्महत्येप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुक करणे तसेच विनयभंगाची खोटी तक्रार करुन मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून संदीपकुमारने आत्महत्या केल्याचा त्याच्या भावाने केला आहे. सपना कारु पासवान, सरीता कारु पासवान, कारु दासो पासवान, राजन कारु पासवान आणि गौतम कारु पासवान अशी या पाचजणांची नावे आहेत. या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दिपककुमार सिताराम पासवान हा मूळचा झारखंडचा रहिवाशी असून तो तेथीलच एल ऍण्ड टी कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे. त्याला दोन भाऊ असून त्यापैकी संदीपकुमार हा त्याचा लहान भाऊ आहे. तो गोवंडी येथे राहत असून भांडुपच्या एका खाजगी कंपनीत अकाऊंटट म्हणून कामाला होता. दुसरा भाऊ चंदनकुमार हा आसाम येथे राहत असून त्याचा तिथे कोचिंग इन्स्टीट्यूट आहे. २०१८ साली कोलकाता येथे शिक्षण घेत असताना संदीपकुमारला सपना पासवानसोबतचा लग्नाचा नातेवाईकाकडून प्रस्ताव आला होता. सपना ही चेंबूरच्या सेल कॉलनी, यशवंतनगरची रहिवाशी आहे. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. संभाषणादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा तो तिला भेटण्यासाठी कोलकाता येथून मुंबईत भेटायला येत होता. काही वर्षांनी शिक्षणानंतर तो मुंबईत नोकरीसाठी आला होता.

दोन ते तीन कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर तो सध्या भांडुपच्या खाजगी कंपनीत अकाऊंटट म्हणून कामाला लागला होता. याच दरम्यान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. स्वतचा फ्लॅट घेण्यासाठी सपनाने त्याच्याकडे साडेबारा लाख रुपये घेतले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्याचे सपनाची आईशी क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या वादानंतर त्यांनी सपनाचे संदीपकुमारशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने सपनासह तिच्या कुटुंबियाकडे फ्लॅटसाठी दिलेल्या साडेबारा लाखांची मागणी केली होती. त्यापैकी सात लाख रुपये त्यांनी परत केले, मात्र वारंवार मागणी करुनही ते त्याला उर्वरित पाच लाख रुपये देत नव्हते. पैशांची मागणी करत असल्याने पासवान कुटुंबियांनी संदीपकुमारविरुद्ध नेहरुनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती. याच गुन्ह्यांत कारवाई केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पासवान कुटुंबिय त्याचा सतत मानसिक शोषण करत होते.

लग्नाचे आमिष दाखवून पैसे घेऊन पाच लाखांचा अपहार करुन त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार केल्याने संदीपकुमार हा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याची समाजात प्रचंड बदनामी झाली होती. त्यातच पासवान कुटुंबियांकडून त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. याच धमकीला कंटाळून १७ सप्टेंबर २०२४ रोजी संदीपकुमारने त्याच्या गोवंडीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संदीपकुमारच्या आत्महत्येला सरीतासह तिचे कुटुंबिय जबाबदार होते, त्यामुळे दिपककुमारने देवनार पोलीस ठाण्यात पासवान कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच सरीतासह तिच्या आई-वडिल आणि दोन्ही भावाविरुद्ध देवनार पोलिसांनी संदीपकुमारला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page