प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल

मानसिक व शारीरिक शोषण केल्याचा प्रेयसीवर आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी अरहमा हबीबउल्ला अन्सारी नावाच्या प्रेयसीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर तिचा प्रियकर शोएब तय्यबअली सय्यद (22) याचा मानसिक व शारीरिक शोषणासह सतत पैशांची मागणी, महागडे गिफ्ट, स्वतंत्र राहण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. याच दबावाला कंटाळून मानसिक नैराश्यातून शोएबने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी प्रेयसीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तोहराबी तय्यबअली सय्यद ही महिला गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहते. तिचा मोठा मुलगा तोहीब हा चालक तर लहान मुलगा शोएब हा गेल्या दोन वर्षांपासून बेलापूर येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. याच परिसरात राहणार्‍या अरहमा या तरुणीसोबत शोएबचे प्रेमसंबंध होते. अरहमा ही तिची आई, दोन बहिणीसोबत बैंगनवाडी येथे राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन्ही कुटुंबियांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती होती. जून 2025 पर्यंत तो त्याचा पगार घरी देत होता, मात्र नंतर त्याने पगार देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर त्याने मित्राला पैशांची गरज असल्याने त्याला पेसे दिल्याचे सांगितले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्वभावात प्रचंड बदल झाल्याचे तोहराबीच्या निदर्शनास आले होते. विचारणा केल्यानंतर तो काहीच सांगत नव्हता. बुधवारी 10 सप्टेंबरला तो रात्री नऊ वाजता कामावरुन घरी आला होता. त्यानंतर तो बाहेर गेला आणि एटीएममधून 25 हजार रुपये काढले. त्यानंतर तो अरहमाला भेटण्यासाठी गोवंडी रेल्वे स्थानकात आला होता. तिथेच त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. त्यांच्यातील भांडण त्यांच्या परिचित एका मित्राने पाहिले होते. काही वेळानंतर त्याने अरहमाला 25 हजार रुपये दिले आणि तो घरी निघून आला. घरी आल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ दिसत होता. रात्री साडेअकरा वाजता तो रुममध्ये झोपण्यासाठी गेला. रात्री तोहराबीने त्याला आवाज दिला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. तिने दार ठोठावूनही तो दार उघडत नव्हता.

तिने खिडकी उघडून पाहिले असता शोएबने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिला दिसून आले. त्यानंतर घरातील इतरांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून त्याला तातडीने नूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. दुसरीकडे सय्यद कुटुंबियांना शोएबच्या आत्महत्येचा प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येमागील कारणाचा शोध सुरु केला होता.

तपासात शोएब आणि अरहमा यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. ती त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करत होती. तिने त्याच्याकडून एक सोन्याची चैन आणि महागडे गिफ्ट घेतले होते. त्यासाठी शोएबने तिच्याकडे तीन लाख रुपये जमा केले होते. इतकेच नव्हे तर अरहमाच्या आईच्या उपचारासाठी शोएबने आर्थिक मदत केली होती. शोएबच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोशल मिडीयावरुन त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अरहमा हिने काही दिवसांत शोएबचे चांगलेच ब्रेन वॉश केले होते. स्वतच्या फायद्यासाठी ती त्याचा वापर करत होती. त्यायावर दबाव आणून त्याच्याकडे सतत पैशांची तसेच महागडे गिफ्टची मागणी करत होती. घरच्या लोकांशी संबंध तोडून त्याला घर सोडण्यास दबाब आणत होती.

इतकेच नव्हे तर तिच्या पालकांच्या शेजारी त्याने घर घ्यावे यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. त्याने तसे केले नाहीतर तिने त्याच्याशी असलेले प्रेमसंबध तोडण्याची धमकी दिली होती. तिच्याकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणामुळे शोएब हा प्रचंड मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले.

या घटनेनंतर तोहराबीने अरहमाविरुद्ध शोएबचा मानसिक व शारीरिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करुन तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अरहमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चौकशीनंतर अरहमाविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page