मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – घरकाम करताना हातसफाई करुन मोलकरणीनेच व्यावसायिकाच्या पत्नीचे सुमारे 23 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रितू नावाच्या मोलकरणीविरुद्ध गोवंडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. जून महिन्यांत ही चोरी झाली होती, त्याची तक्रार नोव्हेंबर महिन्यांत झाल्याने रितूची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिचा या गुन्ह्यांत सहभाग आहे की नाही याचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अनुराधा भरत पंजाबी ही 53 वर्षांची महिला चेंबूर येथील दिव्य स्वप्न सोसायटीच्या फ्लॅटमध्ये 42 मध्ये तिच्या पती आणि मुलासोबत राहते. तिचा पती भरत यांचा शूज विक्रीचा व्यवसाय असून चेंबूर येथे त्यांच्या मालकीचे एक शॉप आहे. घरात कुठलीही चांगला घटना घडली की सोन्याचे दागिने देण्याची त्यांच्या कुटुंबात एक प्रथा आहे. त्यामुळे आतापर्यंत तिने वेगवेगळ्या कारणावरुन सोन्याचे दागिने बनविले होते. ते दागिने तिने तिच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते.
अनेकदा कार्यक्रमांत ते दागिने घातल्यानंतर ती पुन्हा दागिने लॉकरमध्ये ठेवत होती. तिच्याकडे रितू नावाची एक महिला कामाला असून तिच्या व्यक्तिरिक्त तिच्या घरी कोणी येत नाही. सकाळी दहा वाजता कामावर आल्यानंतर रितू ही दुपारी दिड वाजता काम करुन तिच्या घरी जात होती. जून महिन्यांत तिच्या लॉकरमधून सुमारे 23 लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने रितूकडे विचारणा केली होती, यावेळी ती प्रचंड घाबरली होती. तिने उडवाउडवीचे उत्तरे देऊन तिने दागिने घेतले नसल्याचे सांगितले.
चोरी केलेले दागिने ती परत करेल असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने तिला काही दिवसांची मुदत दिली होती, मात्र तिने चोरीचे दागिने परत केले नाही. त्यामुळे अनुराधा पंजाबी हिने गोवंडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रितूविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रितूविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून रितूची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर या चोरीमागे तिचा सहभाग आहे का याचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.