रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा जखमी
पायाला दुखापत झाल्याने क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने सिनेअभिनेता गोविंदा जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अंधेरीतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याच्या पायावर ऑपरेशन करण्यात आले असून त्याला तीन ते चार आठवडे आराम करण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी मिसफायरची नोंद केली असून जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. ज्या रुममध्ये ही घटना घडली, ती रुम बंद करण्यात असून लवकरच पोलिसाकडून रुमचा पंचनामा केला जाणार आहे. दरम्यान गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त समजताच बॉलीवूडसह राजकीय नेत्यांनी त्याच्या तब्येची विचारपूस केली होती.
अभिनेता गोविंदा हा सध्या जुहू येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याचा विरार येथेही एक बंगला आहे. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे गेली होती. सकाळी तोदेखील कोलकाता येथे जाणार होता. तिथे जाण्यापूर्वी त्याने त्याचे रिव्हॉल्व्हर कपाटातून काढून ते पुन्हा बॉक्समध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि त्यातून एक गोळी मिसफायर झाली. ती गोळी त्याच्या पायाला लागल्याने गोविंदा जखमी झाला होता. यावेळी त्याचा बॉडीगार्ड आणि संरक्षण शाखेचा पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होता. हा प्रकार समजातच त्याने रक्तबंबाळ झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आले. ही माहिती समजताच जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी रुग्णालयात जाऊन गोविंदाची चौकशी केली होती. यावेळी पोलिसांनी त्याची प्राथमिक जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीत त्याने घडलेला प्रकार प्रसंग पोलिसांना सांगितला. गोविंदाचा घर बंद असल्याचे या रुमची पोलिसाकडून लवकरच पंचनामा केला जाणार आहे. ही रुम सध्या बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ते रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले जाईल.
गोविंदाला वीस वर्षांपूर्वी ०.३२ बोअरच्या रिव्हॉल्व्हरचा परवाना मिळाला होता. मिसफायरची घटना घडली त्यावेळेस गोविंदा आणि त्यांचा पोलीस कर्मचारी बॉडीगार्ड असे दोघेच घरी होते. जुहू येथे घरात असताना गोविंदा त्यांच्यासोबत त्यांचे रिव्हॉल्व्हर घेऊन येतात. सिनेअभिनेता गोविंदाने यापूर्वी कॉंग्रेस पक्षातून लोकसभेची निवडणुक लढविली होती. पाच वर्ष तो कॉंग्रेस पक्षाचा खासदार होता. मात्र नंतरच्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. अलीकडेच त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गोविंदावर लवकरच महत्त्वाची जबाबदारी सोपविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मिसफायरमध्ये गोविंदा जखमी झाल्याचे समजताच स्वत एकनाथ शिंदे यांनी त्याची फोनवरुन विचारपूस केली होती. शिंदे गटासह इतर काही नेत्यांनी गोविंदाची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्याच्या तब्येची विचारपूस केली.
गोविंदावर उपचार करणार्या डॉ. रमेश अग्रवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, गोविंदाला रुग्णालयात आणल्यानंतर ते रक्तबंबाळ अवस्थेत अवस्थेत होते. त्यांच्या उजवा पायाच्या हाडाला लागली होती. ऑपरेशनदरम्यान ही गोळी काढण्यात आली आहे. त्यांना तीन ते चार दिवस बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. याच दरम्यान त्यांना पायाची अजिबात हालचाल करायची नाही आहे. मात्र दुखापत बरी होण्यास किमान तीन ते चार आठवडे लागतील. चालताना त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे. चार आठवड्यानंतर त्यांच्या पायाची टेस्टसह एक्सरे काढले जाईल आणि त्यानंतर पुढील उपचार सुरु होतील असे सांगितले.
गोविंदा साडेचार वाजता घरातून निघणार होता. मात्र रिव्हॉल्व्हर ठेवताना पावणेपाच वाजता मिसफायर झाले. या रिव्हॉल्व्हरमध्ये सहा जिवंत काडतुसे होती. त्याला नवीन रिव्हॉल्व्हर घ्यायचे होते, मात्र त्यापूर्वीच ही घटना घडली. गोविंदाचा भाचा विजय आनंदने गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचे पत्रकारांना सांगितले. ही माहिती मिळताच तो रुग्णालयात गोविंदाला भेटण्यासाठी गेला होता. मी गोविंदाला भेटलो असून तो स्वस्थ आहे. बजरंग बलीच्या आर्शिर्वादामुळे आपण थोडक्यात बचावलो असे गोविंदाने त्याला सांगितले.