मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – गुढीपाडवा आणि रमजान ईदनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ, जलद प्रतिसाद पकि, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बँक्ट तसेच होमगार्ड आदींना तैनात करण्यात आले आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करुन मुंबईकरांनी पाडवा आणि ईदचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करावा असे आवाहन पोेलिसांकडून करण्यात आले आहे.
रविवारी 30 मार्चला गुढीपाडवा आणि 31 मार्चला रमजान ईद असल्याने मुंबई शहरात दोन्ही सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. गुढीपाडव्यानिमित्त शहरात जागोजागी हिंदू बांधवाकडून पूजा-अर्चा, प्रार्थना, शोभा यात्रा-मिरवणुका, पालख्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवाकडून मशिदीत मोठ्या प्रमाणात नमाज पठण केले जाते. या काळात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, या सणाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत सात अतिरिक्त पोलीस आयुक्त, सतरा पोलीस उपायुक्त, पन्नास सहाय्यक पोलीस आयुक्त, 1982 पोलीस अधिकारी आणि 11 हजार 820 पोलीस अंमलदारांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला वाहतूक पोलिसांसह महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड आदींची मदत घेतली जाणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून मुंबईकरांनी पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास त्याची माहिती पोलिसाां द्यावी, सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून गुढीपाडवा आणि ईद सण आनंदात आणि उत्साहात साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.