हाजीअली दर्गा बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ
गुन्हा दाखल; स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – हाजीअली दर्गा तातडीने खाली करा, तिथे मला स्वतचे घर बांधायचे आहे. दर्गा खाली केला नाहीतर बॉम्बस्फोटाने उडवून देऊ, त्याला कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला गोळ्या घालू अशी धमकी अज्ञात व्यक्तीकडून हाजीअली दर्ग्याच्या प्रशासकीय कार्यालयात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकीसह धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद अहमद ताहेर शेख हे कुर्ला येथे राहत असून सध्या हाजीअली दर्गा येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात. मंगळवारी आणि बुधवारी असे सलग दोन दिवस ते त्यांच्या प्रशासकीय कार्यालयात होते. यावेळी त्यांच्या कार्यालयात दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. कॉल करणार्या व्यक्तीने त्याचे नाव पवन असल्याचे सांगून तो दिल्लीचा रहिवाशी आहे. हाजीअली दर्ग्यात बॉम्ब ठेवला असून दर्गा लवकरात लवकर खाली करा. नाहीतर हाजीअली दर्जा बॉम्बस्फोटाने उडवून देऊ अशी धमकी दिली होती. कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात येईल. दर्गा खाली करा. मला तिथे माझे घर बनवायचे आहे असे बोलून त्यांच्याशी अश्लील भाषेत संभाषण करण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे पवन नावाच्या व्यक्तीने हाजीअली दर्गा येथे बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देऊन त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत भावना दुखावणारे वक्तव्य केले होते.
या घटनेनंतर मोहम्मद अहमद यांनी ताडदेव पोलिसांना ही माहिती सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पवन नावाच्या व्यक्तीविरुद्ध धमकीसह धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीच्या अटकेसाठी ताडदेव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. मोहम्मद अहमद यांनी पोलिसांना दोन मोबाईल क्रमांक दिले आहे. या मोबाईल क्रमांकावरुन आरोपीची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या दोन्ही मोबाईचे सीडीआर काढण्याचे काम सुरु असून लवकरच धमकी देणार्या व्यक्तीला अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.