मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑगस्ट 2025
मुंबई, – जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात मालाडच्या हनुमान मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी दोन आरोपींना मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मोहम्मद रिझवान मजीबुल अन्सारी आणि शोएब इमाम खान अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने मंदिरातील इतर चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाडच्या सुंदरनगर परिसरात दिपक रामनंदन मिश्रा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. याच परिसरातील एका हनुमान मंदिरात ते पुजारी म्हणून काम करतात. सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजता मंदिर भाविकासाठी खुले असते. मंदिराच्या दानपेटीतून महिन्याला अंदाजे सात ते आठ हजार रुपये जमा होतात. 28 जुलैला रात्री साडेनऊ वाजता ते नेहमीप्रमाणे मंदिर बंद करुन घरी गेले होते. यावेळी त्यांनी मंदिरातील कपाटात सहा हजाराची कॅश ठेवली होती. दुसर्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मंदिरात आले होते. यावेळी त्यांना मंदिरातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी मंदिरात प्रवेश करुन पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करुन चोरी केल्याचे दिसून आले.
कपाटातील सहा हजाराची कॅश तसेच दानपेटीतील कॅश चोरट्याने चोरी केली होती. अंदाजे तेरा हजार रुपयांची कॅश पळविण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालाड पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद रिझवान आणि शोएब खान या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.