घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील त्रिकुटाला अटक
तिन्ही आरोपींविरुद्ध 40 हून अधिक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील त्रिकुटाला आरे पोलिसांनी अटक केली. स्टॅलिन चार्लिस कोंडर, अनिल लहान्या जिंबल ऊर्फ अल्बर्ट अणि अब्दुल लतिफ हमीद अन्सारी ऊर्फ खोटा अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेने आरे पोलीस ठाण्यातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयगणेश कृष्णमूर्ती हे गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची सासू कलायेलुमलाई या त्यांच्या घराजवळील एका निवासी इमारतीमध्ये राहते. नोव्हेंबर 2025 ती तिच्या तामिळनाडूच्या विल्लमपुरम गावी कामानिमित्त गेली होती. यावेळी तिने तिचे सर्व दागिने तिच्या कपाटातील लोखंडी कपाटात ठेवले होते. सासू घरी नसल्याने ते अधूनमधून घरी जाऊन पाहणी करत होते. 19 जानेवारी 2026 रोजी त्यांना त्यांच्या सासूच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील विविध सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरे पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर जयगणेश कृष्णमूर्ती यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्हयांत स्टॅलिन कोंडर याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो गुजरातच्या अहमदाबाद शहरात लपला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, गणेश पाटील, पोलीस शिपाई बरकडे, देवधरे, सागर पवार यांनी अहमदाबादच्या हाटकेश्वर सर्कल परिसरातून स्टॅलिन कोंडरला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने त्याच्या इतर दोन सहकार्यांच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने अनिल जिंबल आणि अब्दुल अन्सारी या दोघांना अटक केली.
तपासात ते तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. यातील स्टॅलिनविरुद्ध दिडोंशी व आरे पोलीस ठाण्यात प्रत्येकी दहा असे वीस गुन्हे तर अनिल आणि अब्दुल यांच्याविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात 39 तर आरे पोलीस ठाण्यात 1 अशा 40 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या तिघांनी कलायेलुमलाई हिच्या फ्लॅटनंतर याच परिसरातील इतर दोन फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली.
एका आठवड्यात त्यांनी तीन घरात घरफोडी केली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेने या तिन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकलक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.