मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – पन्नासहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस नवघर पोलिसांनी अटक केली. शॉन मेरवान गोदीवाला ऊर्फ दिनेश गणपत मोरे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शॉनविरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, मिरा-भाईंदर तसेच इतर ठिकाणी अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अटकेने काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याने लवकरच त्याचा संबंधित पोलिसांना दिला जाणार आहे.
यातील तक्रारदार महिला मुलुंड येथे राहत असून ६ जुलैला तिच्या घरी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी तिच्या घरात प्रवेश करुन सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांत घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष धाडवे, पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंके, पोलीस हवालदार पाटील, वाघचौरे, पोलीस शिपाई राठोड, आंब्रे, मोरे, दंडगव्हाड, रोकडे आणि महिला पोलीस शिपाई काळे यांनी शॉन गोदीवाला याला संशयित आरोपी म्हणूनत ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच त्याच्या सहकार्याच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांतील काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शॉन हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, नवी मुंबई व इतर ठिकाणी ५० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी तीसहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंके असून आरोपीचा ताबा मिळण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. या गुन्ह्यांत शॉनचा एक सहकारी फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.