घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपींना अटक

दोन गुन्ह्यांची उकल करुन चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यानी अटक केली. जिकरान जाहिद कुरेशी आणि मुनकिब जब्बार शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेने ताडदेव आणि वांद्रे परिसरात झालेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

9 जून ते 10 जून 2025 च्या मध्यरात्री ताडदेव येथील साने गुरुजी मार्ग, रहिमतबाब इमारत क्रमांक एकच्या दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन लाखो रुपयांचे 430 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी ताडदेव पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती. रात्री घडलेल्या या घरफोडीने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती.

याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल चंद्रमोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, पोलीस हवालदार अरुण घाटकर, आकाश मांगले, वैभव गिरकर, पोलीस शिपाई विकास चव्हाण, मारुती खेडकर यांनी इतर पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

याच फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपींचा शोध सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी मुंबईतून पळून गेले असून सध्या ते रतनाम जंक्शन परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानतर या पथकाने स्थानिक जीआरपीएफ पोलिसांना ही माहिती दिली होती. या पथकाने गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांच्या मदतीने जिकरान कुरेशी आणि मुनकिब शेख या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांना अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. यातील जिकरान हा दिल्ली तर मुनकिब हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे.

जिकरान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने चालू वर्षांत निर्मलनगर हद्दीत एक घरफोडी केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत तो वॉण्टेड आरोपी होता. तीन वर्षांपूर्वी त्याने निर्मलनगर येथे एक घरफोडी केली होती. या गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने दोन महिने आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा घरफोडी करु लागला होता. चालू वर्षांत त्याने निर्मलनगरनंतर ताडदेवच्या हद्दीत दोन घरफोडी केली होती. या गुन्ह्यांतील चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी ताडदेव पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page