साडेसात लाखांच्या घरफोडीप्रकरणी वॉण्टेड पत्नीला अटक
पतीच्या दागिन्यांसह कॅशची चोरी करुन केले होते पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून दिराच्या घरी ठेवलेल्या सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या आरोपी पत्नीला दोन महिन्यांनी दिडोंशी पोलिसांनी अटक केली. निशादेवी अच्छेलाल साह असे या 21 वर्षीय आरोपी पत्नीचे नाव असून याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहेत. निशादेवीचा पती अच्छेलाल साह याने सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश असा साडेसात लाखांचा मुद्देमाल एका सुटकेसमध्ये त्याच्या भावाकडे ठेवला होता, ही सुटकेच एप्रिल महिन्यांत निशादेवी चोरी करुन पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अच्छेलाल रामशिष साह हे मूळचे बिहारच्या मोतीहारीचे रहिवाशी असून सध्या त्यांची पत्नी निशादेवीसोबत मालाडच्या गोविंदनगर, नवजाला चाळीत राहत होते. 2008 साली मुंबई शहरात नोकरीसाठी आल्यानंतर त्यांनी नर्सरीचा व्यवसाय सुरु केला होता. 2019 साली त्यांचा निशादेवीशी लग्न झाले होते. तेव्हापासून ती त्यांच्यासोबत नवजाला चाळीत राहत होती. अनेकदा ते नर्सरीच्या व्यवसायातून मिळणारी रक्कम त्यांच्या सुटकेसमध्ये ठेवत होते. त्यात त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने व इतर महत्त्वाचे दस्तावेज होते. 1 मेला त्यांच्या पत्नीच्या छोट्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे ते दोघेही बिहारला लग्नासाठी जाणार होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून नेहमीच खटके उडत होते. त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. या वादामुळे त्यांचे बिहारला जाणे लांबले होते. 17 एप्रिलला अच्छेलाल आणि निशादेवी यांच्यात पुन्हा क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. यावेळी तिने त्यांच्याकडे तिच्या दागिन्यांची मागणी केली होती, ते दागिने दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांची सुटकेस जवळच राहणार्या त्यांच्या भावाकडे ठेवण्यासाठी दिली होती. यावेळी सुटकेमध्ये काही कॅश, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज होते. याच पैशांतून त्यांना गावी प्रॉपटी खरेदी करायची होती.
23 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी बारा वाजता निशादेवी ही तिच्या पतीच्या भावाच्या घरी गेली आणि तिने सुटकेसमधील दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, 5 लाख 53 हजाराची कॅश, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासबुक, एटीएम कार्ड असा 7 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर अच्छेलाल याला त्याच्या भावाकडून समजले होते. त्यामुळे ते घरी गेले असता तिथे त्यांना निशादेवी सापडली नाही. ती पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी दिडोंशी पोलिसांत त्यांच्या पत्नीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निशादेवीविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या निशादेवी साह हिला पोलिसांनी अटक केली. चौकशीत तिनेच तिच्या घरातून सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली होती. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.