सायन हॉस्पिटलच्या प्रोफेसरच्या घरी 46 लाखांची घरफोडी

तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जुलै 2025
मुंबई, – सायन हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर असलेल्या एका महिलेच्या घरी झालेल्या 46 लाखांच्या घरफोडीच्या गुन्ह्यांत तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. रंजीतकुमार उपेंद्रकुमार सिंह ऊर्फ मुन्ना असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. रंजीतकुमार हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडीचे विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी 18 मार्च रात्री साडेनऊ ते बुधवार 19 मार्च 2025 या कालावधीत सकाळी सव्वापाचच्या दरम्यान मालाड येथील मंच्छुभाई रोड, पुष्पा कॉलनीतील पारिजात बंगल्यात घडली. याच बंगल्यात देवांगी आशुतोष पारिख ही 46 वर्षांची महिला तिच्या कुटुंबियंसोबत राहते. ती सायन हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर म्हणून तर तिचे पती इंजिनिअर म्हणून काम करतात. तिच्याकडे तिची सासू कुंजलता आणि सासर्‍याची मामी रंजना मेहता यांचे काही हिरेजडीत सोन्याचे दागिने होते. ते दागिने तिने तिच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. 18 मार्चला घरातील सर्व मंडळी जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेली होते.

सकाळी सव्वापाच वाजता तिला जाग आली होती. त्यामुळे ती तळमजल्यावर आली होती. यावेळी तिला तिच्या बंगल्यातील मागील दरवाज्याचे कडीकोयंडा आणि लॉक तुटलेला दिसून आला. बंगल्याचा दरवाजा उघडा होता. अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश करुन कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले होते. कपाटात ठेवलेले विविध सोन्यासह हिरेजडीत दागिने असा सुमारे 46 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने तिच्या पतीसह इतर सदस्यांना ही माहिती दिली होती. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती.

ही माहिती प्राप्त होताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण बंगल्यासह कपाटाची पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने तळमजल्याच्या दरवाज्यातून आत प्रवेश करुन कपाटातील 46 लाखांचे दागिने चोरी केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी देवांगी पारिख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांत रंजीतकुमारचा सहभाग उघडकीस आला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यावर पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page