60 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपीस अटक

दादरा-नगर हवेली परिसरात मालाड पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जुलै 2025
मुंबई, – मुंबईसह ठाणे ग्रामीणच्या विविध पोलीस ठाण्यात 60 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली. आतिश दत्ताराम साखरकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घरफोडीनंतर तो केंद्रशासित प्रदेश, दादरा-नगर हवेली येथे लपला होता, अखेर त्याला तेथून पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबईत आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

विपुल विजयकुमार सांडव हे मालाडच्या मामलेदारवाडी, राजदीप सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 101 मध्ये राहतात. 9 फेब्रुवारीला त्यांच्या राहत्या घरी चोरी झाली होती. त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे विविध सोन्याचे दागिने आणि चांदीचे ब्रेसलेट असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच विपुल सांडव यांनी मालाड पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. काही दिवसांत उत्तर मुंबईत दिवसा-रात्रीच्या घरफोडीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, पोलीस हवालदार संतोष सातवसे, अमीत गावंड, अविनाश जाधव, पोलीस शिपाई महेश डोईफोडे, दलित पाईपराव, वैभव थोरात, आदित्य राणे यांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. यातील काही फुटेजमध्ये आतिश साखरकर हा दिसला होता. त्यानेच ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

यावेळी तो केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर-हवेली येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तेथून आतिशला शिताफीने अटक केली. तपासात आतिश साखरकर हा सिल्वासा, गुरुदेव सोसायटीचा रहिवाशी आहे. तो रेकॉर्डवरील घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ठाणे ग्रामीणसह उत्तर-पश्चिम उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

त्यात विलेपार्ले व बोरिवली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी सात, गोरेगाव पोलीस ठाणे सव्वीस, जोगेश्वरी पोलीस ठाणे सहा, वनराई व वाळीव पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, दिडोंशी, कस्तुरबा मार्ग, चारकोप, वसई, नालासोपारा, डी. एन नगर आणि सांताक्रुज पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूण 60 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page