मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 सप्टेंबर 2025
मुंबई, – गेल्या आठवड्यात अंधेरीतील एका मेडीकल स्टोरमध्ये झालेल्या घरफोडीचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी यासीन रशीद गौस ऊर्फ छोटा लुकडी या 26 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. यासिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीसह पाकिटमारी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या अठराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपास अधिकारी अविनाश दराडे यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
महादेव बापूराव गवळे हे अंधेरीतील लोखंडवाला सर्कलजचळील न्यू म्हाडा सोसायटी परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे अंधेरीतील दादाभाई रोड, अंकुर सोसायटीमध्ये श्री समर्थ नावाचे एक जनरल आणि मेडीकल स्टोर आहे. 2 सप्टेंबरला दिवसभराचे काम संपल्यांनतर ते दुकान बंद करुन घरी गेले होते. दुसर्या दिवशी ते दुकानात आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांना सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. दुकानातील एक मोबाईल, सीसीटिव्ही कॅमेर्याचे डीव्हीआर, एक लाख सात हजार रुपयांची कॅश तसेच दुकानातील इतर साहित्य असा सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला होता. या घटनेनंतर त्यांनी डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रोहन बंगाळे, महेश फडतरे, रेवन्नाथ घुगे, पोलीस शिपाई ऋषिकेश बाबर, सुमीत पोळ, प्रसाद वरे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी यासीन गौस याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तपासात त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी संगणक, डीव्हीआर मशिन, गुन्ह्यांतील साहित्य, हातोडी, स्क्रू ड्राव्हर, एक्सा ब्लेड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. यासीन हा अंधेरीतील गिल्बर्ट हिल रोड, पाटकर कंपाऊंड परिसरात रस्त्यावर राहतो. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध डी. एन नगर, आंबोली, जुहूसह इतर पोलीस ठाण्यात चोरीसह जबरी चोरी, पाकिटमारी, घरफोडीच्या अठराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अलीकडेच त्याला चोरीच्या एका गुन्ह्यांत दिड वर्षांची शिक्षा झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्याच्याकडे काहीच काम नसल्याने तो हेल्पर म्हणून काम करत होता.
याच दरम्यान त्याने दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस श्री समर्थ जनरल आणि मेडीकल स्टोरमध्ये चोरी केली होती. या चोरीनंतर तो पळून गेला होता. मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या सात दिवसांत त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे व अन्य पोलीस पथकाने शिताफीने अटक करुन या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.