दहिसर येथे दोन फ्लॅटमध्ये घरफोडी करणार्‍या त्रिकुटास अटक

तिन्ही आरोपीविरुद्ध 40 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – दहिसर येथील दोन फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे. मोईनुद्दीन निजामुद्दीन शेख, मोहम्मद गुलाबनबी शेख आणि अकबरअली फत्तेमोहम्मद राहीन अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून 40 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांच्या अटकेने दहिसर, मालाड, एमएचबी आणि भांडुप पोलीस ठाण्यातील सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

रामचंद्र मारोती सकपाळ हे दहिसर परिसरात राहतात. 26 नोव्हेंबरला ते काही कामानिमित्त गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून काही अज्ञात चोरट्यानी त्यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणार्‍या रंजुदेवी देवेेंद्र सिंग यांच्या घरातील लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील कॅश, कपडे व इतर मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. 27 नोव्हेंबरला हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लहाने, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नार्वेकर, पोलीस हवालदार कोलासो, भाट, जाधव, पोलीस शिपाई चुगीवाडीयार, सुशांत जाधव, आव्हाड, शनवार, राठोड, पोलीस हवालदार पवार यांनी मोईनुद्दीन शेख, मोहम्मद गुलाबनबी आणि अकबरअली राहिन या तिघांनाही अंधेरी आणि साकिनाका येथून पोलिसांनी अटक केली.

चौकशीत तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 40 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने चालू वर्षांतील दहिसर येथील तीन, मालाड, भांडुप आणि एमएचबी पोलीस ठाण्यातील सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page