21 लाखांच्या घरफोडीप्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – महालक्ष्मीतील सातरस्ता परिसरातील एका फ्लॅटमध्ये झालेल्या 21 लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह चोरीचे दागिने खरेदी करणार्‍या सोनाराला अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी 16 लाख 51 हजार 140 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अरबाजअली मोहसीनअली मलिक ऊर्फ रेहमान टेकडी आणि अजीत गोविंद चव्हाण अशी या दोघांची नावे आहेत. यातील अरबाजअली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 33 हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुरेश गोरेलाल जायस्वाल हे महालक्ष्मी येथील सातरस्ता, धोबीघाटच्या ओमकार टॉवर इमारतीमध्य राहतात. एका खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनीत ते सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. 29 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. लग्नानंतर संपूर्ण कुटुंबिय मध्यप्रदेशातील उज्जैन शहरात असलेल्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. घरातून निघण्यापूर्वी त्यांनी सर्व सोन्या-चांदीचे दागिने, लग्नात जमा झालेले आणि खर्चासाठी ठेवलेले कॅश किचन आणि बेडरुमच्या कपाटात ठेवले होते. 20 डिसेंबरला मध्यप्रदेशात असताना त्यांच्याच शेजारी राहणार्‍या आशा किसन गुप्ता या वयोवृद्ध महिलेने त्यांच्या पत्नीला फोन करुन त्यांच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने तिचा भाचा विशाल मदनलाल जायस्वालला घरी जाण्यास सांगितले. तो त्यांच्या घरी गेला होता. यावेळी त्याला घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते सर्वजण मुंबईला येण्यासाठी निघाले.

21 डिसेंबरला घरी आल्यानंतर त्यांना कपाटातील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने तसेच सव्वातीन लाखांची कॅश असा 19 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना हा प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आग्रीपाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन अरबाजअलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली होती. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीसह जबरी चोरी, घरफोडी आणि फसवणुकीच्या सुमारे 33 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी हा वारंवार गंभीर गुन्हे करत असल्याने त्याच्याविरुद्ध 112 भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत तसेच 55 मपोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्याच्याविरुद्ध मुंबईसह उपनगरातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना त्याने महालक्ष्मी परिसरातील एका फ्लॅटमध्ये घरफोडी केली होती.

त्यापूर्वी त्यााने दादर, वडाळा टीटी, आग्रीपाडा, भायखळा परिसरात पाचहून अधिक घरफोडी केल्याची कबुली दिली होती. तपासात चोरीचे सोन्याचे दागिने त्याने अजीत चव्हाण या सोनाराला विकल्याची कबुली दिली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत नंतर अजीतला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून चोरीचा उर्वरित मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page