घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह अटक
चार दिवसांपूर्वी एका फ्लॅटमध्ये चोरी करुन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीला समतानगर पोलिसांच्या विशेष पथकाने चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह शिताफीने अटक केली. शुभम अजय शर्मा असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चार दिवसांपूर्वीच त्याने कांदिवलीतील एका फ्लॅटमध्ये सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली आहे.
उमेश रविंद्र रसाळ हे कांदिवलीतल पोयसर, गावदेवी रोड, बाबूभाई सिद्धीकी चाळीत त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत राहतात. उमेश हे ज्वेलरी शॉपमध्ये तर त्यांची पत्नी खाजगी कंपनीत कामाला आहे. सोमवारी 19 जानेवारीला ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले तर त्यांची पत्नी मुलीला शिकवणीसाठी सोडून तिच्या कामासाठी गेली होती. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता.
कपाटातील विविध सोन्याचे दागिन्यासह इतर मुद्देमाल असा चार लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल चोरी करुन आरोपी पळून गेला होता. रात्री कामावरुन घरी आलेल्या उमेश रसाळ यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन दागिन्यांसह इतर मुद्देमालाची चोरी केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर, सहाय्यक फौजदार राजेश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, पोलीस शिपाई दौलत साळुंके, निलेश भिकले, योगेश साबळे यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात या घरफोडीमागे शुभम शर्मा असल्याचे उघडकीस आले.
पोयसर परिसरातून शुभमला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून गुन्ह्यांतील सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. शुभम हा पोयसर, गावदेवी रोड, कृपाशंकर चाळीतील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.