गोरेगाव येथील पत्रकाराच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जानेवारी 2026
मुंबई, – गेल्या आठवड्यात गोरेगाव येथे एका पत्रकाराच्या झालेल्या सुमारे पंधरा लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात वनराई पोलिसांना यश आले आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हर्ष राजेश ठाकूर या आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
27 वर्षांची तक्रारदार तरुणी गोरेगाव येथील वनराई कॉलनीत राहत असून ती सध्या एका नामांकित न्यूज चॅनेलमध्ये न्यूज रिपोर्टर म्हणून काम करते. तिचे एका तरुणासोबत लग्न ठरले असून ते दोघेही तीन वर्षांपासून एकत्र राहतात. तिचे आई-वडिल विरार येथे राहत असून 10 जानेवारीला ती त्यांना भेटण्यासाठी विरार येथे गेली होती. दुसर्या दिवशी रात्री दहा वाजता तिचे भावी पती कामानिमित्त दिल्लीत गेले होते. 13 जानेवारीला विरार येथे असताना तिला तिच्या पतीचा कॉल आला होता. त्याने घरी चोरी झाल्याचा संशय व्यक्त करुन तिला घरी येऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यामुळे ती तिच्या वडिल आणि भावोजीसोबत गोरेगाव येथील घरी आली होती.
यावेळी तिला तिच्या फ्लॅटचे लॉक तुटलेले दिसून आले. तिने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता तिचे कपाट उघडे होते. सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला विविध सोन्याचे दागिने आणि अकरा लाख रुपयांची कॅश असा पंधरा लाख दहा हजार रुपयांचा चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच तिने वनराई पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केल्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी हर्ष ठाकूर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.