जुहू येथील व्यावसायिकाच्या घरी सफाई कर्मचार्याचा डल्ला
आजारी पत्नीच्या उपचारासाठी घरफोडी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जानेवारी 2026
मुंबई, – जुहू येथे राहणार्या एका वयोवृद्ध व्यावसायिकाच्या घरी सफाई कर्मचार्यांनीच डल्ला मारला. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक करण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे. शक्ती शंकर मंडल आणि विजय देवेंद्र अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सफाई कर्मचारी आहेत. यातील शक्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडीच्या तीनहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. विजयची पत्नी आजारी असून तिच्या उपचारासाठी त्याने शक्तीच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नैशध धनशाम पटेल हे 76 वर्षांचे वयोवृद्ध व्यावसायिक त्यांची पत्नी दक्षा हिच्यासोबत विलेपार्ले येथील जेव्हीपीडी, हटकेश सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा स्वतचा रबर प्रोडेक्शनचा व्यवसाय आहे. 1 जानेवारी ते त्यांच्या पत्नीसोबत गुजरात येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी फ्लॅटचा दरवाजा आणि खिडक्या व्यवस्थित बंद केले होते. 8 जानेवारी त्यांचा नातू विवान हा त्यांच्या घरी आला होता, यावेळी त्याला त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. अज्ञात चोरट्याने खिडकीच्या जाळीला भोक पाडून आत प्रवेश केला होता. कपाटातील विविध हिरेजडीत दागिने एक लाख पत्तीस हजार रुपयांची कॅश असा पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच नैराध पटेल यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण हे करत होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शक्ती मंडलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने ही चोरी केल्याची कबुली देताना त्याला विजय देवेंद्र याने मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर विजय देवेंद्र याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात शक्ती आणि विजय हे दोघेही सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. शक्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. नैशध पटेल यांच्या सोसायटीजवळच विजय हा सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. त्यामुळे हा परिसर त्याच्या परिचित होता.
नैशध पटेल यांचा फ्लॅट बंद असल्याची माहिती त्याने शक्तीला दिली होती. त्यानंतर या दोघांनी तिथे चोरीची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे शक्ती हा चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरी गेला होता तर विजय हा बाहेर पहारा देत होता. चोरीनंतर ते दोघेही पळू गेले होते. विजयची पत्नी आजारी असल्याने त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच त्याने शक्तीच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित मुद्देामल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण यांनी सांगितले. याच गुन्ह्यांत अटक केल्याने दोन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण, पोलीस हवालदार अमीत महांगडे, नितीन मांडेकर, अर्जुन घाडीगावकर, पोलीस शिपाई आकाश घोडके, प्रितम भोसले यांनी केली.