अठरा गुन्ह्यांची उकल करुन घरफोडीच्या गुन्ह्यांतील चौकडीला अटक
एकाच वेळेस मेडीकल शॉपसह सहा दुकानात चोरी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जानेवारी 2026
ठाणे, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका चौकडीला गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. विनयकुमार कृपाशंकर पासवान, प्रदीप रामबहादूर निशाद, राजवीर संजूसिंग लाहोरी आणि सलमानअली अहमदअली शेख अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या अटकेने घरफोडीच्या अठराहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अलीकडेच या टोळीने नौपाडा परिसरात एका मेडीकल शॉपसह पाच दुकानातील कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर या सर्वांना टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत आहे.
अनिल सखाराम परबळकर हे ठाण्यातील नौपाडा परिसरात राहत असून व्यावसायिक आहेत. त्यांच्या मालकीचे एक मेडीकल शॉप आहे. जानेवारी महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात त्यांच्या मेडीकल शॉपसह इतर पाच दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मोबाईलसह कॅश असा मुद्देमाल चोरी केला होता. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी नौपाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. रात्री उशिरा एकाच वेळेस सहा शॉपमध्ये झालेल्या घरफोडीने स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन प्रॉपटी सेलच्या अधिकार्यांनी विनयकुमार पासवान आणि प्रदीप निशाद या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत या दोघांचाही सहभाग उघडकीस आला होता. त्याच्या चौकशीतून राजवीर लाहोरी आणि सलमानअली शेख या दोघांचे नावे समोर आले होते. त्यानंतर या दोघांनाही अनुक्रमे गुजरातच्या बिलीमोरा आणि पुण्यातील देहू रोड परिसरातून पोलिसांनी अटक केली. तपासात चारही आरोपी मूळचे उल्हासनगरचे रहिवाशी आहे. दिवसा रेकी करुन ही टोळी रात्री वेळेस घरफोडी करत होती.
त्यांच्या चौकशीतून अठराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी मुंबईसह ठाणे, ठाणे ग्रामीण, कोल्हापूर शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. घरफोडीसाठी ते चौघेही चोरीच्या रिक्षासह बाईकचा वापर करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सव्वालाखांचे वेगवेगळ्या कंपनीचे सहा मोबाईल जप्त केले आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, संजय भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस हवालदार दिनेश कुंभारे, जयकर जाधव, प्रशांत भुर्के, संदीप भांगरे, महेश साबळे, राहुल शिरसाठ, पोलीस नाईक सचिन वानखेडे, सचिन कोळी, तौसिफ सैयद, पोलीस अंमलदार महेश सावंत, चालक पोलीस अंमलदार सदर मुळे, महिला पोलीस हवालदार आशा गोळे, महिला पोलीस नाईक गिताली पाटील यांनी केली.