घरफोडीच्या पाच गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस 28 वर्षांनी अटक
पाचही गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच पळून गेला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – घरफोडीच्या पाच गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस जोगेश्वरी पोलिसांनी 28 वर्षांनी अटक केली. अण्णादुराई ऊर्फ राजू करपन्ना देवेंद्र असे या आरोपीचे नाव असून नालासोपार्याचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. पाच गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच राजू हा पळून गेला होता, त्याचा गेल्या 28 वर्षांपासून पोलीस शोध घेत होते, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राजू हा नालासोपारा येथील शनि मंदिराजवळील चार नंबर रोड परिसरात राहत होता. घरफोडीच्या गुन्ह्यांतील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 1998 साली त्याने जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या पाच घरफोडी केली होती. याच गुन्ह्यांत त्याला नंतर जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला नंतर न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याला कोर्टाने पाचही घरफोडीच्या गुन्ह्यांत जामिन दिला होता.
जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे कोर्टाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला फरार आरोपी घोषित केले होते. तसेचि त्याच्या अटकेसाठी जोगेश्वरी पोलिसांना आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. मात्र तो गेल्या 28 वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच राजू हा विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल सूर्यवंशी, पोलीस शिपाई गौरव कदम, मंगेश मोंडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी नेहरुनगर परिसरात आलेल्या राजूला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत घरफोडीच्या पाच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला तोच आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला अटक करुन विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.