मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जानेवारी २०२५
मुंबई, – मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात घरफोडीच्या ७५ हून अधिक गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अजान अली खान असे या ३८ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने अलीकडेच सांताक्रुज येथील एअरटेल कंपनीच्या गॅलरीत घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने घरफोडीच्या इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पवन छेदीलाल वैश्य हा विरार परिसरात राहत असून गेल्या एक वर्षांपासून एअरटेल कंपनीत कामाला आहे. सांताक्रुज येथील एस. व्ही रोड, दर्शना स्मृतीमध्ये एअरटेलची एक गॅलरी असून तिथे तो कामाला होता. ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री सर्व कामगार घरी गेल्यानतर एअरटेल गॅलरी बंद करुन तो घरी निघून गेला होता. रात्री उशिरा या गॅलरीचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने आतमध्ये प्रवेश करुन आतील मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या उघडकीस येताच पवन वैश्यने सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत होते. याच प्रयत्नात असताना या गुन्ह्यांतील आरोपी टिळक रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिं दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, सहाय्यक फौजदार जयेश फाटक, पोलीस शिपाई श्रीनिवास चिला, मनोज पाटील, मारुती गावडे, प्रसाद यादव यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी तिथे अजान खान हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच एअरटेल गॅलरीत चोरी केल्याची कबुली दिली.
चौकशीत अजान अली हा मालाडच्या मढ आयलंड, ओल्ड फेरी रोडचा रहिवाशी असून घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दिवसा रेकी केल्यानंतर तो रात्रीच्या वेळेस मुंबईतील विविध ठिकाणी घरफोडी करतो. त्याच्याविरुद्ध धारावी, आंबोली, सहार, गोरेगाव, वनराई, ओशिवरा पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात ७५ हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.