मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मार्च 2026
मुंबई, – विलेपार्ले येथे राहणार्या एका वयोवृद्ध शेअर व्यावसायिकाच्या घरातील कुलूप तोडून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतराने तोडून सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या कटातील दोन आरोपींना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अकबर शेख आणि सीमा सोनी अशी या दोघांची नावे असून यापूर्वी याच गुन्ह्यांत मोहम्मद शाकीर शेख या आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. या तिघांकडून पोलिसांनी 30 ते 35 लाखांचा चोरी हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस गबाजी चिमटे यांनी सांगितले. अटकेनंतर अकबर शेख आणि सीमा सोनी या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पावणेसात ते सव्वासातच्या सुमारास विलेपार्ले येथील प्रार्थना समाज रोड, इंदू भवनसमोरील पाठारे बंगल्यात घडली. या बंगल्याच्या तळमजल्यावर 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार प्रविण चंद्रकांत पाठारे हे त्यांची पत्नी सेजल यांच्यासोबत राहतात. त्यांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. 19 जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता ते हनुमान रोड येथे चहा पिण्यासाठी तर त्यांची पत्नी कामासाठी बाहेर गेली होती.
सायंकाळी सव्वासात वाजता त्यांची पत्नी सेजल यांनी त्यांना कॉल करुन त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटचे सेफ्टी आणि मेन डोअरचे लॉक तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता आतमध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. कपाटातील दागिन्यांची पाहणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने विविध सोन्याचे दागिने, चांदीचे सामान असा सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. अज्ञात व्यक्तीने अवघ्या अर्ध्या तासांत घरात प्रवेश करुन 41 लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यांच्या दुसर्याच आठवड्यात मोहम्मद शाकीर शेख याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत अकबर आणि सीमा यांचे नावे समोर आले होते. मोहम्मद शाकीरच्या अटकेनंतर ते दोघेही पळून गेले होते. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या अकबर आणि सीमा या दोघांना अखेर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी काही दागिने विक्री केले होते.
या दागिन्यांसह त्यांच्याकडील दागिने असा सुमारे तीस ते पत्तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.