मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – दिवसा घरफोडी करणार्या एका सराईत आरोपीस मुलुंड पोलिसांनी अटक केली. राजेश अरविंद राजभर असे या 32 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या लालगंज, गजरीचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने पाच घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांतील चौदा लाखांचे 28 तोळे सोन्याचे दागिने आणि दिड लाखांचे चांदीचे दागिने असा साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टाने सोमवार 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
17 मार्च 2025 रोजी मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅरेथॉन ईमिनेस या पॉश अपार्टमेंटमध्ये तक्रारारासह त्यांच्या शेजारी राहणार्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये घुसून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी उघडकीस येताच तक्रारदारासह इतर रहिवाशांनी मुलुंड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घडणार्या घरफोडीच्या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे यांनी गंभीर दखल घेत मुलुंड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन खाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल कारंडे, पोलीस हवालदार राजकुमार वाघमारे, पोलीस शिपाई संदीप आव्हाड, संतोष चाकणकर, गणेश कट्टे, रमेश ढेबे, बस्तीराम बोडके, सचिन बनसोडे यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका फुटेजमध्ये राजेश राजभर संशयितरीत्या फिरताना दिसून आला होता. हाच धागा पकडून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना राजेशला कळवा येथील एका बैठ्या चाळीतील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. अलीकडेच्या काळात त्याने मुलुंडसह नेहरुनगर, भांडुप, उलवे पोलीस ठाण्याच्या पाच घरफोडी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी साडेपंधरा लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते.
मार्च महिन्यांत राजेश हा विमानाने वाराणसी येथून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याने मुलुंड, भांडुप, उलवे आणि नेहरुनगर हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी केली होती. अटकेच्या भीतीने त्याने कळवा परिसरातील एका चाळीत भाड्याने रुम घेतला होता. तिथे तो राहत होता. राजेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध डोबिवली, विष्णूनगर, वसई, विठ्ठलवाडी, मानपाडा, पेन पोलीस ठाण्यात सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा घरफोडी करत होता.