36 लाखांच्या घरफोडीप्रकरणी रेकॉर्डवरील आरोपीस अटक
इमारतीच्या पाईपवरुन चढून घरात प्रवेश करुन चोरी केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या पाईपवरुन चढून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन 36 लाखांचा सोन्याचे, हिर्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पळवून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच या घरफोडीचा अवघ्या बारा तासांत पर्दाफाश करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत संतोष सुरेश चौधरी ऊर्फ वैतू या 23 वर्षांच्या रेकॉर्डवरील आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे सर्व सोन्याचे, हिर्याचे दागिने असा 36 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सुरेश घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 28 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तो इमारतीच्या पाईपवरुन चढून घरात प्रवेश करुन चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना गुरुवारी रात्री बारा ते तीनच्या सुमारास मालाड येथील एस. व्ही रोड, रामबाग लेन, अॅडव्हेंट प्लाजो अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 404 मध्ये सज्जनकुमार जीवराजका हे व्यावसायिक त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहतात. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर त्यांचे आई-वडिल बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा त्यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. कपाटातील विविध सोन्याचे, हिर्यांचे दागिने असा 36 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या सकाळी आठ वाजता हा प्रकार त्यांच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आला होता. बेडरुममधील कपाट उघडे होते, कपाटातील सर्व दागिने आणि पैसे चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.
हा प्रकार आई-वडिलांकडून समजताच सज्जनकुमार यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घरफोडीची अतिरिवक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत यांनी गंभीर दखल घेत मालाड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर उत्तर प्रादेशिक विभागाच्या पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्याचे तीन ते चार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे, हेमंत गिते, पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, गौस सय्यद, नितीन साटम, पोलीस हवालदार संतोष सातवसे, जयदीप जुवाटकर, अमीत गावड, अविनाश जाधव, मंदार गोंजारी, गावकर, तावडे, पोलीस शिपाई सचिन गायकवाड, दलीत पाईपराव, वैभव थोरात, तिजोरे, आदित्य राणे यांन तपास सुरु केला होता.
सोसायटीसह परिसरातील शंभरहून अधिक सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये एक तरुण तिथे संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांना दिसून आले. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु असताना तो तरुण सुरेश चौधरी असल्याचे उघडकीस आले. सुरेश हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सुरेश हा जोगेश्वरी पटरीजवळील एका कच्च्या झोपडीत लपला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती, मात्र पोलिसांची माहिती समजताच सुरेश तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी त्याला पोलिसांनी पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या अंधेरीतील विरा देसाई रोड, कंट्री कल्बजवळील श्यामनगर चाळीतील राहत्या घरातून पोलिसांनी चोरीचा संपूर्ण 36 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात सुरेश हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात दहा, खार, कांदिवली, आंबोली प्रत्येकी तीन, बोरिवली, सांताक्रुज प्रत्येकी दोन, जुहू चार तर गोरेगाव, वर्सोवा, चारकोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा 28 हून अधिक रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.